चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सचा संघ युएईत पोहोचला आहे. युएईत चेन्नईच्या संघाने सरावही सुरु केला असून नेटमध्ये कर्णधार महेंद्र सिंह धोनी चांगलाच घाम गाळत आहेत. आता धोनीचा एक व्हिडिओ समोर आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहेत. आयपीएल दुसऱ्या टप्प्यात वादळ येणार आहे, असं तो या व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

आयपीएल २०२१ चा व्हिडिओ इंडियन प्रिमिअर लीगने पोस्ट केला आहे. या व्हिडिओतील महेंद्रसिंह धोनीच्या नवीन लूकची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत धोनी कलरफूल कपड्यात दिसत आहेत. तसेच त्याने केसही वेगवेगळ्या रंगात रंगवले आहेत. धोनीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. “मेहरबान-साहेबान, आयपीएल के कदरदान. बच्चा पहलवान. इंटरवेल के बाद आएगा दूसरे हाफ का तूफान. ड्रामा है, सस्पेंस है क्लाइमैक्स है. गब्बर है, हिटमॅन है, हेलीकॉप्टर का टेकऑफ है. किंग है, प्लेऑफ है, सुपरओव्हर है. पहला हाफ तो सिर्फ झांकी है, आयपीएल के दूसरे हाफ का असली पिक्चर बाकी है.”, असं महेंद्रसिंह धोनी व्हिडिओत बोलताना दिसत आहे.

आयपीएल २०२१ या स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली होती. मात्र करोनाचं संकट पाहता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. एक एक करत करोनाची लागण खेळाडूंना होत गेली आणि बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयोजन करण्यापूर्वीच स्पर्धेवर करोनाची पडछाया होती. मात्र बायो बबलचं कारण देत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परदेशी खेळाडूंनी आयपीएल आयोजनावर प्रश्न उपस्थित करत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी ही स्पर्धा अर्ध्यात सोडली होती. या स्पर्धेतील अजून ३१ सामने उरले आहेत.