विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (आरसीबी) पुन्हा एकदा आयपीएलच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आरसीबीला ४ गड्यांनी धूळ चारत स्पर्धेबाहेर ढकलले. आरसीबीचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिरकीपटू सुनील नरिनने घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर कोलकात्याने बंगळुरुला २० षटकात ७ बाद १३८ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात कोलकाताने हे आव्हान गाठण्यात आपले ६ फलंदाज गमावले, पण शुबमन गिल आणि नरिन यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्यांना विजय मिळवता आला. नरिनला सामनावीर पुरस्कार मिळाला. विराटचा हा आरसीबीचा कप्तान म्हणून शेवटचा सामना ठरला. कोलकाताला आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्शी भिडावे लागणार आहे. १३ ऑक्टोबरला हा सामना याच मैदानावर होईल.

कोलकाताचा डाव

व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी कोलकातासाठी चांगली सुरुवात केली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने शुबमनला चकवले. डिव्हिलियर्सकडे झेल देऊन तो माघारी परतला. शुबमनने ४ चौकारांसह २९ धावा केल्या. सातव्या षटकात कोलकात्याने राहुल त्रिपाठीला गमावले. बंगळुरुचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने त्याला पायचीत पकडले. त्रिपाठीला फक्त ६ धावा करता आल्या. त्यानंतर नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यरने भागीदारी रचली. १० षटकात कोलकात्याने २ बाद ७४ धावा केल्या. ११व्या षटकात हर्षल पटेलने सलामीवीर व्यंकटेश अय्यरला माघारी पाठवले. अय्यरला २६ धावा करता आल्या. हर्षलने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमात ड्वेन ब्राव्होची बरोबरी साधली. ब्राव्होने २०१३मध्ये ३२ बळी घेतले होते. अय्यर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सुनीन नरिनने ख्रिश्चनच्या ४ चेंडू १९ धावा कुटत कोलकात्याचे शतक पूर्ण केले. त्याने ख्रिश्चनच्या एका षटकात २२ धावा वसूल केल्या. हेच षटक बंगळुरुला महागात पडले. त्यानंतर कोलकात्याने नरिन आणि कार्तिकला गमावले, पण शाकिब अल हसन आणि कप्तान मॉर्गनने विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा – अर्जुनविरुद्ध खेळताना सचिननं कॅरमध्येही दाखवली जादू; VIDEO पाहून तुम्हीच म्हणाल, ‘‘बाप बाप होता है!”

बंगळुरुचा डाव

सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी बंगळुरुसाठी ४९ धावांची सलामी दिली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने देवदत्तला त्रिफळाचीत केले. देवत्तने २१ धावा केल्या. ६ षटकात बंगळुरुने १ बाद ५३ धावा केल्या. देवदत्तनंतर अडखळत सुरुवात केलेला श्रीकर भरत १०व्या षटकात सुनील नरिनचा बळी ठरला. त्याला १४ चेंडूत ८ धावा करता आल्या. १० षटकात बंगळुरुने २ बाद ७० धावा केल्या. मॉर्गनने १३व्या षटकात चेंडू नरिनकडे सोपवला. त्याने बंगळुरुचा कप्तान विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. विराटने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. १४व्या षटकात बंगळुरुने शतक पूर्ण केले. पण पुढच्याच षटकात नरिनने गोलंदाजीला येत डिव्हिलियर्सची दांडी गुल केली. त्याला फक्त ११ धावा करता आल्या. आपल्या शेवटच्या षटकात नरिनने ग्लेन मॅक्सवेलला तंबूत धाडत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला. मॅक्सवेलला १५ धावा करता आल्या. नरिनने ४ षटकात २१ धावा देत ४ बळी टिपले. २० षटकात बंगळुरुने ७ बाद १३८ धावा केल्या. नरिनव्यतिरिक्त कोलकाताकडू लॉकी फर्ग्युसनने २ बळी घेतले.

Live Updates
23:08 (IST) 11 Oct 2021
बंगळुरूला विजेतेपदाची पुन्हा हुलकावणी

मॉर्गन-शाकिबने २ चेंडू राखून बंगळुरुने दिलेले आव्हान पूर्ण केले. या पराभवासह बंगळुरू संघ आयपीएल २०२१ स्पर्धेबाहेर झाला आहे. विराट कोहलीचा हा बंगळुरुसाठी कप्तान म्हणून शेवटचा सामना ठरला. कोलकाता आता १३ ऑक्टोबरला क्लालिफायर दोनच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

23:01 (IST) 11 Oct 2021
कोलकातासमोर समीकरण

कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी ७ धावांची गरज आहे. महागडा ख्रिश्चन बंगळुरुसाठी शेवटचे षटक टाकत आहे.

22:57 (IST) 11 Oct 2021
कोलकाताला सहावा धक्का

याच षटकात सिराजने कार्तिकला यष्टीपाठी झेलबाद करत कोलकाताला सहावा धक्का दिला. कार्तिकनंतर शाकिब अल हसन मैदानात आला. १८ षटकात कोलकाताने ६ बाद १२७ धावा केल्या.

22:51 (IST) 11 Oct 2021
नरिन क्लीन बोल्ड!

१८व्या षटकात मोहम्मद सिराजने नरिनला क्लीन बोल्ड केल. नरिनने ३ षटकारांसह २६ धावा केल्या. नरिननंतर कप्तान मॉर्गन मैदानात आला आहे.

22:45 (IST) 11 Oct 2021
नरिनला जीवदान

१७व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर नरिनने उंच फटका खेळला, पण पडिक्कलने त्याचा झेल सोडला. कोलकाताला १८ चेंडूत विजयासाठी १८ धावांची गरज आहे.

22:34 (IST) 11 Oct 2021
नितीश राणा बाद

१५व्या षटकात चहलने नितीश राणाला तंबूत पाठवत कोलकाताला चौथा धक्का दिला. राणाने २३ धावांची संयमी खेळी केली. राणानंतर दिनेश कार्तिक मैदानात आला आहे. १५ षटकात कोलकाताने ४ बाद ११२ धावा केल्या.

22:26 (IST) 11 Oct 2021
कोलकात्याचं शतक पूर्ण

अय्यर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सुनीन नरिनने ख्रिश्चनच्या ४ चेंडू १९ धावा कुटत कोलकात्याचे शतक पूर्ण केले. त्याने ख्रिश्चनच्या एका षटकात २२ धावा वसूल केल्या.

22:21 (IST) 11 Oct 2021
हर्षलचा विक्रम

हर्षलने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमात ड्वेन ब्राव्होची बरोबरी साधली. ब्राव्होने २०१३मध्ये ३२ बळी घेतले होते.

आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स:

३२ ड्वेन ब्राव्हो (२०१३)

३२ हर्षल पटेल (२०२१) *

३० कागिसो रबाडा (२०२०)

२८ जेम्स फॉकनर (२०१३)

२८ लसिथ मलिंगा (२०११)

२७ जसप्रीत बुमराह (२०२०)

22:20 (IST) 11 Oct 2021
कोलकात्याला तिसरा धक्का

११व्या षटकात हर्षल पटेलने सलामीवीर व्यंकटेश अय्यरला माघारी पाठवले. अय्यरला २६ धावा करता आल्या.

22:12 (IST) 11 Oct 2021
अय्यरला जीवदान

१०व्या षटकात बंगळुरुच्या शाहबाझ अहमदने व्यंकटेश अय्यरला जीवदान दिले. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर अय्यरने मोठा फटका खेळला, पण अहमदने तो झेल सोडला. १० षटकात कोलकात्याने २ बाद ७४ धावा केल्या.

22:02 (IST) 11 Oct 2021
राहुल त्रिपाठी बाद

सातव्या षटकात कोलकात्याने राहुल त्रिपाठीला गमावले. बंगळुरुचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने त्याला पायचीत पकडले. त्रिपाठीला फक्त ६ धावा करता आल्या. नितीश राणा मैदानात आला आहे.

21:50 (IST) 11 Oct 2021
कोलकात्याला पहिला धक्का

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने शुबमनला चकवले. डिव्हिलियर्सकडे झेल देऊन तो माघारी परतला. शुबमनने ४ चौकारांसह २९ धावा केल्या. त्याच्यानंतर राहुल त्रिपाठी मैदानात आला आहे. ६ षटकात कोलकात्याने १ बाद ४८ धावा केल्या.

21:46 (IST) 11 Oct 2021
गिलची हॅट्ट्रिक

चौथ्या षटकात शुबमन गिलने बंगळुरुचा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनला सलग तीन चौकार ठोकले.

21:32 (IST) 11 Oct 2021
कोलकाताच्या डावाची सुरुवात

व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली.

21:11 (IST) 11 Oct 2021
कोलकात्याला १३९ धावांचं आव्हान

२० षटकात बंगळुरुने ७ बाद १३८ धावा केल्या. नरिनव्यतिरिक्त कोलकाताकडू लॉकी फर्ग्युसनने २ बळी घेतले.

21:09 (IST) 11 Oct 2021
बंगळुरुचा सातवा फलंदाज माघारी

शेवटच्या षटकात बंगळुरुचा डॅन ख्रिश्चन धावबाद झाला.

21:02 (IST) 11 Oct 2021
बंगळुरुकडून निराशा

१९व्या षटकात फर्ग्युसनने शाहबाझला तंबूत धाडले. १९ षटकात बंगळुरुने ६ बाद १२६ धावा केल्या.

20:52 (IST) 11 Oct 2021
बंगळुरुचा अर्धा संघ गारद

आपल्या शेवटच्या षटकात नरिनने ग्लेन मॅक्सवेलला तंबूत धाडत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला. मॅक्सवेलला १५ धावा करता आल्या. नरिनने ४ षटकात २१ धावा देत ४ बळी टिपले. १७ षटकात बंगळुरुने ५ बाद ११३ धावा केल्या. आता बंगळुरूकडून डॅनियल ख्रिश्चन आणि शाहबाझ अहमद फलंदाजी करत आहेत.

20:39 (IST) 11 Oct 2021
बंगळुरुचे शतक पूर्ण; पण..

१४व्या षटकात बंगळुरुने शतक पूर्ण केले. पण पुढच्याच षटकात नरिनने गोलंदाजीला येत डिव्हिलियर्सची दांडी गुल केली. त्याला फक्त ११ धावा करता आल्या. डिव्हिलियर्सनंतर शाहबाझ अहमद मैदानात आला आहे. १५ षटकात बंगळुरुने ४ बाद १०८ धावा केल्या.

20:30 (IST) 11 Oct 2021
बंगळुरुला मोठा धक्का

मॉर्गनने १३व्या षटकात चेंडू सुनील नरिनकडे सोपवला. त्याने बंगळुरुचा कप्तान विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. विराटने ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स मैदानात आला आहे.

20:19 (IST) 11 Oct 2021
१० षटकात बंगळुरू

१० षटकात बंगळुरुने २ बाद ७० धावा केल्या. भरत माघारी पतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला आहे.

20:17 (IST) 11 Oct 2021
भरत माघारी

अडखळत सुरुवात केलेला भरत १०व्या षटकात सुनील नरिनचा बळी ठरला. त्याला १४ चेंडूत ८ धावा करता आल्या.

19:56 (IST) 11 Oct 2021
बंगळुरुला पहिला धक्का

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने देवदत्तला त्रिफळाचीत केले. देवत्तने २१ धावा केल्या. देवदत्तनंतर श्रीकर भरत मैदानात आला आहे. ६ षटकात बंगळुरुने १ बाद ५३ धावा केल्या.

19:48 (IST) 11 Oct 2021
४ षटकात बंगळुरू

बंगळुरुने ४ षटकात बिनबाद ३६ धावा केल्या आहेत.

19:29 (IST) 11 Oct 2021
सामन्याला सुरुवात

सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी बंगळुरुच्या डावाची सुरुवात केली आहे.

19:05 (IST) 11 Oct 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स - ईऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), डॅनियल ख्रिश्चन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, जॉर्ज गार्टन, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल.

19:03 (IST) 11 Oct 2021
विराटनं जिंकला टॉस

आरसीबीचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:34 (IST) 11 Oct 2021
नाणेफेक कधी?

सायंकाळी सात वाजता नाणेफेक होईल.

18:29 (IST) 11 Oct 2021
कोलकाताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

ईऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन/आंद्रे रसेल, सुनील नरिन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.