आयपीएल २०२१ स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यास रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ अपयशी ठरला आहे. कोलकाता आणि मुंबईचे समान गुण असूनही धावगतीच्या जोरावर कोलकाताने बाजी मारली. मुंबईचा संघ आयपीएल २०२१ स्पर्धेत एकूण १४ सामने खेळला. या १४ सामन्यापैकी २ सामन्यात दुखापतीमुळे हार्दिक पांड्या मुकला. मात्र १२ सामन्यात एकदाही त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. त्यात हार्दिक पांड्याची निवड टी २० विश्वचषकासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे हार्दीक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? याकडे लक्ष वेधलं असता मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने उत्तर दिलं आहे.

“हार्दिक पांड्या आयपीएल २०२१ स्पर्धेत षटक टाकलं नाही. फिजिओ, ट्रेनर्स आणि मेडिकल टीम त्याच्या गोलंदाजीवर काम करत आहेत. आम्ही एका वेळेस एका सामन्याचा विचार करतो. त्यानंतर पुढचा विचार करतो. कदाचित पुढच्या आठवड्यापासून तो गोलंदाजी करेल. याबाबत डॉक्टर आणि फिजिओ अपडेट देऊ शकतात.”, असं रोहित शर्माने स्पष्ट केलं. हार्दीकने १२ सामन्यात फलंदाजी करताना १२७ धावा केल्या. यात नाबाद ४० धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी चांगलीच रंगत झाली. पंजाब आणि राजस्थान बाहेर गेल्यानंतर मुंबई आणि कोलकातामध्ये चढाओढ सुरु होती. मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पदरी निराशा आली. इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांचे प्रयत्न अपुरे पडले. हैदराबाद पराभूत झाली मात्र मुंबईला धावगती वाढवण्यात अपयश आलं. हैदराबादच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा करताच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या समीकरणामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे.