इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आठ संघांनी एकूण २७ खेळाडूंना आपल्या संघांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यापैकी आठ खेळाडू हे परदेशी आहेत. चेन्नई सुपरकिंग्स, मुंबई इंडियन्स, केकेआर आणि दिल्ली कॅपिटलर्सने प्रत्येकी चार खेळाडू रिटेन केले आहेत. तर आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी तीन खेळाडून रिटेन केलेत. सर्वात कमी रिटेनर हे पंजाब किंग्स संघात आहेत. पंजाबने केवळ दोनच खेळाडू रिटेन केलेत.

या २७ खेळाडूंसाठी २६९ कोटी ५० लाख खर्च करण्यात आलेत. मात्र असं असलं तरी रिटेन करण्यात आलेल्या २७ खेळाडूंपैकी चार खेळाडूंच्या मानधानामध्ये मोठी घट झाली आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला सर्वाधिक फायदा झालाय.

नक्की पाहा ही यादी >> IPL 2022: अनपेक्षित, अनाकलनीय… दमदार कामगिरीनंतरही संघांनी या खेळाडूंना केलं करारमुक्त; अनेक दिग्गजांचा समावेश

चेन्नई सुपर किंग्स
सध्याचे विजेते असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघामध्ये आता सर्वाधिक मानधन असणारा खेळाडू हा धोनी नसून रविंद्र जडेजा आहे. रविंद्र जडेजाला १६ कोटी रुपये देऊन रिटेन करण्यात आलंय. पहिल्या पर्वामध्ये त्याला सात कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच पहिल्या पर्वाच्या तुलनेत त्याचे मानधन दुप्पटीहूनही अधिक वाढलं आहे. त्याला नऊ कोटींचा फायदा झालाय.

कर्णधार धोनीला १२ कोटींना रिटेन करण्यात आलंय. मागील पर्वात धोनीला १५ कोटी देण्यात आले होते. म्हणजे यांचा त्याचे ३ कोटींचे नुकसान झाले. तर इंग्लंडच्या मोइन अलीला एक कोटी रुपयांचा फायदा झाला असून त्याला आठ कोटींना रिटेन करण्यात येणार आहे. यंदाच्या रिझनमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या ऋतूराजने कमाईच्या बाबतीतही फार मोठी उडी घेतलीय. मागील पर्वामध्ये ४० लाखांची बोली लागलेल्या या खेळाडूला यंदा सहा कोटी मानधन देण्यात येणार आहे. म्हणजेच ऋतूराजचा पगार हा १५ टक्क्यांनी वाढलाय.

नक्की वाचा >> IPL 2022: धोनीचा पगार कापला; पाच खेळाडूंना MSD पेक्षा अधिक मानधन; एकाला तर मिळाली ११ कोटींची इन्क्रिमेंट

दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला १६ कोटी देऊन रिटेन करण्यात आलंय. मागील पर्वापेक्षा त्याला एक कोटी रुपये कमी देण्यात आले आहेत. फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला चार कोटींचा फायदा झालाय. पटेलला मागील पर्वात पाच कोटी रुपये मिळाले होते. यंदाच्या पर्वासाठी त्याला नऊ कोटी दिले जाणार आहेत. पृथ्वी शॉचा पगारही दणदणीत वाढलाय. मागील वेळेस १.२ कोटी रुपये घेणाऱ्या पृथ्वीला यंदा साडेसात कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आनरिख नॉर्किएला साडेसहा कोटींना रिटेन करण्यात आलंय.

मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल सांगायचं झाल्यास कर्णधार रोहित शर्माला १६ कोटींची किंमत मोजून रिटेन करण्यात आलंय. मागील पर्वात त्याला १५ कोटी रुपये देण्यात आले होते. यंदा त्याला एक कोटींचा फायदा झालाय. जसप्रीत बुमराहलाही मोठा फायदा झाला आहे. मागील पर्वात सात कोटी मिळालेल्या बुमराहला यंदा १२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. सुर्यकुमार यादवनेही कमाईच्या बाबतीत मोठी झेप घेतलीय. ३.२ कोटी रुपयांसाठी मागील पर्वात मुंबईकडून खेळणार सुर्यकुमार यंदा आठ कोटी रुपये मानधन घेणार आहे. किरॉन पोलार्डला ५.४ कोटींऐवजी यंदा सहा कोटी रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच बुमराहला यंदा पाच कोटी तर सुर्यकुमार यादवला ४.८ कोटींचा फायदा झालाय.

आरसीबी
आरसीबीने विराट कोहलीला १५ कोटींना रिटेन केलं आहे. विराट आता संघाच्या कर्णधारपदी नसणार तरी तो संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे. मागील पर्वामध्ये विराटला १७ कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच यंदा विराटला दोन कोटींचा फटका बसलाय. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीने १४ कोटी २५ लाखांना विकत घेतलं होतं. यंदा त्याला ११ कोटींना रिटेन करण्यात आलं आहे. दुसरीकडे मोहम्मद सिराजनेही मोठी झेप घेत मागील वेळेल्या २.६ कोटींच्या तुलनेत यंदा सात कोटींची कमाई केलीय.

राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला १४ कोटींना रिटेन केलं आहे. मागील पर्वात संजू सॅमसनला ८ कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच संजू सॅमसनला एकूण ६ कोटींचा फायदा झालाय. इंग्लंडच्या जोस बटलरला ४.४ कोटींऐवजी १० कोटी आणि यशस्वी जैस्वालला २.४ कोटींऐवजी चार कोटी देण्यात आलेत.

सनरायजर्स हैदराबाद
सनरायजर्स हैदराबादने कर्णधार केन विल्यम्सनला १४ कोटी देऊन रिटेन केलंय. मागील पर्वात केनला केवळ तीन कोटी रुपये मिळाले होते. जम्मू काश्मीरच्या अब्दुल समदला मागील पर्वात २० लाखांची बोली लागलेली. यंदा त्याला ४ कोटी रुपयांना रिटेन करण्यात आलंय. तसेच उमरान मलिकलाही २० लाखांऐवजी यंदा ४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

कोलकाता नाइट रायडर्स
कोलकाता नाइट रायडर्सचं नेतृत्व करणारा इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनला संघाने करारमुक्त केलंय. संघाने आंद्रे रसेलला १२ कोटींना रिटेन केलं आहे. मागील पर्वात त्याला ८.५ कोटी रुपये मिळाले होते. तर यंदा सर्वाधिक फटका बसलेल्या खेळाडूंमध्ये सुनील नरिनचा समावेश आहे. मागील पर्वात १२.५ कोटी मिळालेल्या नरिनला यंदा सहा कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलंय. म्हणजेच त्याला साडेसहा कोटींचा तोटा झालाय. वरुन चक्रवर्तीलाही ४ कोटींऐवजी ८ कोटी देऊन रिटेन करण्यात आलंय. तर मागील पर्वात २० लाख देण्यात आलेल्या वेंकटेश अय्यरला यंदा ८ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

पंजाब किंग्ज
पंजाब किंग्जने मयांक अगरवालला १२ कोटींची किंमतीवर रिटेन केलं आहे. मागील पर्वात मयांकला १० कोटी मिळाले होते. तसेच यंदा अर्शदीप सिंगला ४ कोटींची बोली लागलीय. मागील पर्वात त्याला केवळ २० लाख मिळाले होते.