आयपीएल २०२२ मधून मोठी बातमी येत आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने त्याच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला अलविदा म्हटले आहे. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२१ मध्ये वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले होते. याशिवाय अनेक सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग-११ मध्येही स्थान मिळाले नाही. संघाने मला सोडल्याचे वॉर्नरने सांगितले. ”आता मी माझे नाव लिलावात देईन”, असे वॉर्नर म्हणाला. आयपीएलच्या पुढील मोसमापासून ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद हे २ नवीन संघ लीगमध्ये सामील झाले आहेत. ६० ऐवजी ७४ सामने खेळवले जातील.

SEN Radio शी बोलताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, ”मी लिलावात माझे नाव देईन. सनरायझर्स हैदराबाद संघ मला कायम ठेवणार नाही, असे अलीकडचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे मी नव्या सुरुवातीची वाट पाहत आहे.” वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपदही जिंकले होते. तो ८ हंगाम संघासोबत राहिला. तो टी-२० लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.

हेही वाचा – धक्कादायक..! पाकिस्तान संघाच्या ३ क्रिकेटपटूंना करोनाची लागण

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील सामने यूएईमध्ये खेळले गेले. मात्र यादरम्यान डेव्हिड वॉर्नरला केवळ २ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ६ सामन्यांत तो संघाबाहेर होता. यावर डेव्हिड वॉर्नर म्हणाला, ”हे माझ्यासाठी कठीण दिवस होते. मला का बाहेर फेकले गेले हे माझ्यासाठी अनाकलनीय असले तरी.” वॉर्नरला टी-२० विश्वचषकातही चांगली सुरुवात करता आलेली नाही.