अहमदाबाद : तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ा मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून आपल्या प्रवासाला आज, रविवारपासून प्रारंभ करणार आहे. मुंबईचे नेतृत्व करताना पहिल्याच ‘आयपीएल’ सामन्यात हार्दिकला आपला माजी संघ गुजरात टायटन्सविरुद्ध खेळावे लागणार आहे.

हार्दिकने गेल्या दोन हंगामांत गुजरात संघाचे यशस्वी नेतृत्व केले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने दोन वर्षांपूर्वी पदार्पणातच ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावण्याची किमया साधली, तर गेल्या वर्षी गुजरातचा संघ उपविजेता ठरला. मात्र, या यशानंतरही हार्दिकने यंदाच्या हंगामापूर्वी मुंबई संघात परतण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडूनच हार्दिकने ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले होते आणि नाव कमावले होते. यंदा मुंबई संघात परतल्यानंतर हार्दिकची थेट कर्णधारपदीही निवड करण्यात आली. मात्र, मुंबईला पाच ‘आयपीएल’ जेतेपदे मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय चाहत्यांना फारसा आवडलेला नाही. समाजमाध्यमांवर मुंबई संघ आणि हार्दिकवर बरीच टीका झाली आहे. त्यामुळे या चाहत्यांची मने जिंकण्याचा हार्दिकचा प्रयत्न असेल. हार्दिक मुंबईकडे परतल्यामुळे गुजरात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 mumbai indians vs gujarat titans match hardik pandya sport news amy
First published on: 24-03-2024 at 00:42 IST