पीटीआय, बंगळूरु

आपल्या गेल्या सामन्यात विजय मिळवलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ शुक्रवारी ‘आयपीएल’मध्ये आमनेसामने येतील, तेव्हा त्यांचा प्रयत्न कामगिरीत सातत्य राखण्याचा असेल.

बंगळूरुने गेल्या सामन्यात पंजाब किंग्जवर चार गडी राखून विजय मिळवला होता, तर कोलकाताने सनरायजर्स हैदराबादला चार धावांनी नमवले होते. यानंतरही दोन्ही संघांच्या आघाडीच्या आणि मध्यल्या फळीतील फलंदाजांबाबत काही समस्या कायम आहेत. दोन्ही संघांतील फलंदाजांमध्ये आक्रमक खेळ करण्याची क्षमता आहे. मात्र, त्यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात दिल्यास मधल्या फळीवरील दडपण कमी होईल

हेही वाचा >>>हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका.

गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध १७७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे बंगळूरुला विजय मिळवण्यात यश आले. परंतु फॅफ ड्युप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन आणि रजत पाटीटार यांना फारशी चमक दाखवता आली नाही. त्यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगळूरुचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाच्या गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहे.

कोहलीकडून पुन्हा अपेक्षा

बंगळूरुचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध ४९ चेंडूंत ७७ धावांची अप्रतिम खेळी केली. तो दमदार कामगिरी सुरू ठेवेल अशी बंगळूरुला आशा असेल. पंजाबविरुद्ध अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिक आणि ‘प्रभावी खेळाडू’ महिपाल लोमरोर यांनी निर्णायक खेळी केली होती. आता कार्तिकवरच हाणामारीच्या षटकांत फटकेबाजी करण्याची जबाबदारी असेल. बंगळूरुच्या गोलंदाजीची भिस्त पुन्हा मोहम्मद सिराजवरच असेल. इतर गोलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागेल.

हेही वाचा >>>IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध

श्रेयस, रिंकूवर नजर

कोलकाताच्या मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांसारखे फलंदाज आहेत. त्यांना सनरायजर्स हैदराबादविरुद्ध चमक दाखवता आली नाही. मात्र, रमणदीप सिंग, रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करत कोलकाताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. श्रेयसला पहिल्या दोनही ‘आयपीएल’ सामन्यांत भोपळा फोडता आला नाही. त्याला कामगिरी उंचवावी लागेल. सर्वोच्च बोली लावत खरेदी केलेला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि वरूण चक्रवर्ती यांना प्रभाव पाडता आलेला नाही.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा