मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या षटकांत थरारक विजय मिळवणाऱ्या चेन्नईचा आता राजस्थान रॉयल्सशी मुकाबला होणार आहे. चेन्नईचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. ब्रेंडान मॅक्क्युलम आणि ड्वेन स्मिथ हे सलामीवीर खणखणीत सलामी देत आहेत. सुरेश रैना उपयुक्त खेळी करत आहे. या त्रिकुटाच्या जोडीला कर्णधार महेंद्रसिंग धोनीही फॉर्मात आल्याने राजस्थानची डोकेदुखी वाढणार आहे. शेवटच्या षटकांत थंड डोक्याने तुफानी फटकेबाजी करणारा धोनी राजस्थानच्या गोलंदाजांसाठी आव्हान ठरणार आहे. फॅफ डू प्लेसिसलाही सूर गवसला आहे. एकूणच फलंदाजी हे चेन्नईचे बलस्थान आहे. गोलंदाजीत रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि सॅम्युअल बद्री या फिरकी त्रिकुटाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नईत लढती होणार नसल्याने रांची हेच चेन्नई सुपर किंग्जचे घरचे मैदान असणार आहे. या मैदानावर आधी झालेल्या लढतीतही चेन्नईने सुरेख विजय मिळवला होता. घरच्या मैदानावर धोनीला रोखणे राजस्थानसाठी कठीम ठरू शकते. सुरुवातीला चाचपडल्यानंतर राजस्थानच्या संघाला सूर सापडला आहे. जेम्स फॉकनर आणि स्टीव्हन स्मिथ या जोडगोळीने ३२ चेंडूत ८५ धावांची तुफानी भागीदारी करत राजस्थानला अशक्यप्राय वाटणारा विजय प्रत्यक्षात साकारला. या अष्टपैलू जोडीवर राजस्थानची भिस्त आहे. रजत भाटिया आणि स्टुअर्ट बिन्नी या भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी राजस्थानसाठी उपयुक्त कामगिरी केली आहे. चेन्नईसारख्या दमदार संघाविरुद्ध विजय मिळवयाचा असेल तर या अष्टपैलू खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. केन रिचर्डसन आणि मुंबईकर प्रवीण तांबे हे कर्णधार शेन वॉटसनसाठी हुकमी एक्के ठरत आहेत. धावा रोखणे आणि विकेट्स मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर हे दो्नघेही यशस्वी ठरले आहेत. कर्णधार शेन वॉटसनला फलंदाजीत सूर गवसल्याने राजस्थानच्या चिंता कमी झाल्या आहेत. मात्र अजिंक्य रहाणे मोठी खेळी अपयशी ठरत आहेत. दुसरीकडे करुण नायरने दोन अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. युवा संजू सॅमसन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. चेन्नईला नमवायचे असल्यास राजस्थानला आपली फलंदाजी मजबूत करावी लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2014 रोजी प्रकाशित
राजस्थानसमोर बलाढय़ चेन्नईचे आव्हान
मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटच्या षटकांत थरारक विजय मिळवणाऱ्या चेन्नईचा आता राजस्थान रॉयल्सशी मुकाबला होणार आहे. चेन्नईचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे.

First published on: 13-05-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 7 chennai super kings eye top spot take on rajasthan royals