माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे मत
मुंबई ट्वेन्टी-२० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या पर्वामुळे खेळाडूंना स्वत:चे कौशल्य दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार असले तरी, पुढील वेळेस इंडियन प्रीमियर लीगपूर्वी (आयपीएल) या स्पर्धेचे आयोजन केल्यास त्यांना अधिक लाभ होईल, अशी प्रतिक्रिया माजी भारतीय क्रिकेटपटू व मुंबई ट्वेन्टी-२० लीगचे आयुक्त सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला.
वानखेडे स्टेडियमवर १४ ते २६ मेदरम्यान मुंबई ट्वेन्टी-२० लीगचे दुसरे पर्व रंगणार आहे. या स्पर्धेच्या घोषणेदरम्यान गावस्कर यांच्यासह महान क्रिकेटपटू व स्पर्धेचा सदिच्छादूत सचिन तेंडुलकर तसेच सल्लागार दिलीप वेंगसरकर उपस्थित होते.
‘‘मुंबई ट्वेन्टी-२० लीगच्या पहिल्या हंगामातून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकतील, असे काही खेळाडू उदयास आले. शिवम दुबे, सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंनी गतवर्षीचा हंगाम गाजवल्यामुळे त्यांना ‘आयपीएल’मध्ये चांगला भाव मिळाला. त्याशिवाय मुंबईने नेहमीच युवा खेळाडू घडवले असून ही स्पर्धा याचेच उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे भविष्यात ‘आयपीएल’ किंवा पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी मुंबई लीगचे आयोजन केल्यास खेळाडूंना अधिक चमकदार कामगिरीची प्रेरणा मिळेल,’’ असे गावस्कर म्हणाले.
मुंबई लीगचा मुंबईच्या स्थानिक क्रिकेटसाठी कसा लाभ होईल, हे विचारले असता सचिन म्हणाला, ‘‘मुंबई लीगमध्ये या वेळी दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. यावरूनच ही स्पर्धा कशाप्रकारे यशस्वी झाली आहे, याचा प्रत्यय येतो. गेल्या काही वर्षांत रणजी करंडक व अन्य स्थानिक स्पर्धामध्ये मुबंईची कामगिरी समाधानकारक नसली तरी या स्पर्धेमुळे खेळाडूंच्या तंत्राची चाचपणी होईल. त्याशिवाय येणाऱ्या काळात मुंबई स्थानिक स्पर्धामध्येही दमदार कामगिरीद्वारे पुनरागमन करून भारतीय संघाला अनेक नवे खेळाडू मिळतील, याची मला खात्री आहे.’’
मुंबईनगरी ही क्रीडाप्रेमींची म्हणून ओळखली जाते, त्यामुळे चाहत्यांनी सामने पाहण्यासाठी प्रत्यक्षात स्टेडियममध्ये येऊन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहनही सचिनने केले.