Abhishek Sharma Angry on Digvesh Rathi Fight Video: सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्सच्य सामन्यात दोन भारतीय खेळाडू एकमेकांविरूद्ध घालताना दिसले. या रोमांचक सामन्यात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा वादळी फटकेबाजी करताना दिसला. अभिषेक शर्माने लखनौने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण यादरम्यान त्याने दिग्वेश राठीबरोबर वाद घातला.
सनरायझर्सचा सलामीवीर अभिषेक शर्मा झेलबाद झाल्यानंतर दिग्वेश राठीवर चांगलाच संतापलेला दिसला. लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केलं आणि संघाला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला, तेव्हा ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंचांना आणि इतर खेळाडूंनाही हस्तक्षेप करावा लागला. पण दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ जात जोरदार वाद घालताना दिसले.
सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या ८ व्या षटकात, अभिषेक शर्मा १९ चेंडूत ५६ धावा करत वादळी खेळी करत मैदानात कायम होता. पण यानंतर दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा मोठा फटका खेळायला गेला आणि सीमारेषेजवळ शार्दुल ठाकूरने त्याला झेलबाद केलं. यानंतर दिग्वेश आणि अभिषेकमध्ये वादावादी सुरू झाली. अभिषेकने दिग्वेशला जवळ बोलावत त्याच्याशी बोलला, तर दिग्वेश त्याला जाऊन म्हणाला, “मी तुम्हाला काहीच बोललो नाही.” पण यानंतर दिग्वेशही वैतागलेला दिसला. तर अभिषेक चांगलाच संतापलेला होता.
दिग्वेशला विकेट मिळाल्यानंतर याशिवाय तो विकेटचा आनंद साजरा प्रसिद्ध ‘नोटबुक सेलिब्रेशन’ने साजरा केला, ज्यामध्ये तो काल्पनिक नोटबुकमध्ये काहीतरी लिहिल्यासारखे हावभाव करतो. त्याचं हे सेलिब्रेशन अनेकदा वादग्रस्त ठरलं आहे कारण काही खेळाडू आणि चाहत्यांनी तो आक्षेपार्ह मानला. पण दिग्वेश मात्र तेच सेलिब्रेशन करतो.
मोठी बाब म्हणजे शार्दुलने अभिषेकला झेलबाद करताच दिग्वेश राठीने त्याला हातवारे करत मैदानाबाहेर जाण्याचा इशाराही केला. त्यानंतर अभिषेक शर्माला राग आला आणि दोन्ही खेळाडू रागाच्या भरात एकमेकांच्या जवळ येऊन वाद घालू लागले. हे पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला. अभिषेक शर्मा यादरम्यान प्रचंड वैतागलेला दिसला. तर दिग्वेश राठीदेखील त्याला प्रत्युत्तर देताना दिसला.
दिग्वेश राठी त्याच्या ‘नोटबुक’ सेलिब्रेशनमुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. ज्यामुळे त्याला आधीच दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या विकेटचे सेलिब्रेशन सौम्य पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. पण तरीही दिग्वेश सातत्याने तसंच सेलिब्रेशन करताना दिसतो. अभिषेक शर्माबरोबरच्या वादानंतर पुन्हा एकदा दिग्वेशला दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.