KKR vs RR, Ajinkya Rahane Catch : कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने १ धावेने सामना आपल्या नावावर केला. शेवटच्या षटकात २२ धावांची गरज होती. राजस्थानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र, शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना राजस्थानला १ धाव काढता आली. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
अजिंक्य रहाणेने घेतला भन्नाट झेल
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सुरू असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी वैभव अरोरा गोलंदाजीला आला. याच षटकात अजिंक्य रहाणेने भन्नाट झेल घेतला. अजिंक्य रहाणे मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत होता. वैभवने लेंथ चेंडू टाकला. या चेंडूवर वैभवने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फटका फसला. चेंडू हवेत उंच गेला,रहाणे झेल घेण्यासाठी उलट्या दिशेने धावत होता. त्याने डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला. मुख्य बाब म्हणजे रहाणेच्या हाताला दुखापत झाली होती, असं असतानाही त्याने डाईव्ह मारून झेल घेतला. हा झेल पाहून वैभव सूर्यवंशीही शॉक झाला.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २०६ धावांचा डोंगर उभारला. कोलकाताकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या गुरबाजने ३५ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने ३० धावा केल्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या अंगकृश रघुवंशीने ४४ धावा केल्या. शेवटी आंद्रे रसेलने ५७ धावा करत संघाची धावसंख्या २०६ पर्यंत पोहोचवली.
राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने दमदार सुरूवात करून दिली. त्याने ३४ धावा चोपल्या. तर वैभव सूर्यवंशी अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. राजस्थानकडून रियान परागने ९५ धावा चोपल्या. त्याचं शतक अवघ्या ५ धावांनी हुकलं. शेवटी हेटमायरने २९ धावा केल्या.
राजस्थानला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी २२ धावा करायच्या होत्या. हा सामना १ चेंडू ३ धावांची गरज इथपर्यंत पोहोचला होता. मात्र शेवटच्या चेंडूवर राजस्थानच्या फलंदाजांना १ धाव काढता आली. यासह कोलकाताने हा सामना १ धावेने आपल्या नावावर केला.