आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील अवघे काही सामने शिल्लक आहेत. लवकरच स्पर्धेतील प्लेऑफ्सचे सामने सुरू होणार आहेत. मात्र, भारत- पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान येत्या १६ मे पासून या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरूवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
आयपीएल स्पर्धा एक आठवडा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बरेच खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा एकदा भारतात बोलवणं हे बीसीसीआय आणि फ्रँचायझींसमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. कारण भारत- पाकिस्तानीत स्थिती पाहता काही खेळाडूंनी घाबरून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता.
तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड संघात परतणार की नाही, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तो दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. या सामन्यानंतर ९ मे ला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सामना होणार होता. या सामन्यातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. अखेर हा सामना रद्द करण्यात आला होता. आता आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर तो कमबॅक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार का?
ऑस्ट्रेलियाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ भिडणार आहेत. मात्र, जोश हेझलवूड साईड स्ट्रेनच्या दुखण्याने त्रस्त आहे. या दुखण्यामुळे त्याला श्रीलंकेविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियासाठी जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे हेझलवूड जर पूर्णपणे फिट नसेल, तर तो आयपीएलचे उर्वरीत सामने खेळणार नाही.
आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. त्यापैकी ८ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. १६ गुणांसह हा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जवळजवळ प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.