IPL 2020 DC vs KXIP: लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यां नव्या दमाच्या कर्णधारांमधील सामन्यात राहुलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय अंतिम काही षटके वगळता बरोबर ठरला. पण शेवटच्या काही षटकांमध्ये मार्कस स्टॉयनीसने तुफान फटकेबाजी केली. त्याच्या २० चेंडूतील अर्धशतकी खेळीने दिल्लीला १५०पार धावसंख्या नेण्यास मदत केली. त्याने अर्धशतकासाठी लगावलेला षटकार विशेष ठरला.
स्टॉयनीस २०व्या षटकापर्यंत खेळत होता. २०वे षटक ख्रिस जॉर्डनला देण्यात आले. षटकातील चार चेंडूचा खेळ झाल्यानंतर स्टॉयनीस १९ चेंडूत ४६ धावांवर होता. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर पायाजवळील चेंडू फुलटॉसप्रमाणे टोलवला. त्याने लगावलेला चेंडू हवेत उंच गेला आणि थेट पॅव्हेलियनमध्ये जाऊन पडला. ९० मीटर लांब असा हा षटकार लगावत त्याने २० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने २१ चेंडूत ५३ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते.
दरम्यान, दिल्लीच्या संघाचे पहिले ३ गडी झटपट बाद झाले. पृथ्वी शॉसोबत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात झालेल्या गोंधळामुळे शिखर धवन माघारी परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सलामीवीर पृथ्वी शॉ देखील ५ धावा काढून बाद झाला. तर पाठोपाठ शिमरॉन हेटमायरही ७ धावा काढून बाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था ३ बाद २२ होती. त्यानंतर ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. ते दोघेही बाद झाल्यावर अखेर स्टॉयनिस फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं आणि संघाला १५०पार पोहोचवले.