अजिंक्य रहाणे आणि कर्णधार शेन वॉटसन यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्स राखून मात केली. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत राजस्थानने सलग पाचव्या सामन्यात विजय मिळवण्याची किमया साधताना चेन्नईला हा जबरदस्त ‘पंच’ दिला. तीन विजयांनंतर चेन्नईचा यंदाच्या हंगामातील हा पहिलाच पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईचा सलामीवीर ड्वेन स्मिथने ४० धावा काढल्या. परंतु त्याला समोरून चांगली साथ लाभली नाही. त्यामुळे चेन्नईची ४ बाद ६५ अशी अवस्था झाली. पण ड्वेन ब्राव्हो (नाबाद ६२) आणि महेंद्रसिंग धोनी (नाबाद ३१) यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९१ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यामुळे चेन्नईने ४ बाद १५६ धावा उभारल्या.
चेन्नईच्या धावसंख्येचे कोणतेही दडपण न घेता दुखापतीतून सावरत प्रथमच खेळणाऱ्या शेन वॉटसनने अजिंक्य रहाणेसोबत १४४ धावांची सलामी नोंदवली. त्यामुळेच राजस्थानचा विजय निश्चित झाला. वॉटसनने ४७ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावा केल्या, तर रहाणेने ५५ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी नाबाद ७६ धावांची खेळी साकारली. रहाणेने सामनावीर पुरस्कारासह ऑरेंज कॅपवर प्रभुत्व मिळवले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद १५६ (ड्वेन स्मिथ ४०, ड्वेन ब्राव्हो नाबाद ६२, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३१; अंकित शर्मा १/२६, ख्रिस मॉरिस १/१९) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १८.२ षटकांत २ बाद १५७ (अजिंक्य रहाणे नाबाद ७६, शेन वॉटसन ७३; रवींद्र जडेजा १/२९)
सामनावीर : अजिंक्य रहाणे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2015 रोजी प्रकाशित
राजस्थानचे विजयी पंचक!
अजिंक्य रहाणे आणि कर्णधार शेन वॉटसन यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्स राखून मात केली.
First published on: 20-04-2015 at 02:24 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk vs rr