IPL 2025, Sai Sudarshan Century: आयपीएल २०२५ स्पर्धेत गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ही अशी एकमेव जोडी आहे जी फोडण्यासाठी गोलंदाजांना घाम फुटतो. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही या जोडीचा बोलबाला पाहायला मिळाला. दिल्लीने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनने शानदार शतकी खेळी केली.
गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांचे आव्हान होते. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे इतका मोठ्या धावांचा डोंगर सर करण्याचा दबाव गुजरात टायटन्स संघावर होता. मात्र, या दोघांची फलंदाजी पाहून दबाव असल्याचं मुळीच दिसून आलं नाही. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
साई सुदर्शनची शतकी खेळी
गुजरात टायटन्सने आपल्याला रिटेन का केलं आहे, हे साई सुदर्शनने पहिल्या सामन्यापासून दाखवून दिलं आहे. साई सुदर्शन हा गुजरातच्या मजबूत फलंदाजीचा स्तंभ आहे. हा स्तंभ शेवटपर्यंत टिकून राहतो म्हणून गुजरातला कुठलंही लक्ष्य सहज पूर्ण करण्यात यश येत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातला २०० धावांचा पाठलाग करायचा होता. हे आव्हान छोटं नव्हतं. पण सुदर्शन शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ६१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ४ षटकार खेचत १०८ धावांची खेळी केली.
गुजरातचा ऐतिहासिक विजय
दिल्लीने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावा करायच्या होत्या. संपूर्ण जबाबदारी टॉप ३ फलंदाजांवर होती. दिल्लीला या तिन्ही फलंदाजांना तंबूत पाठवायचं होतं. मात्र दिल्लीचे गोलंदाज सलामी जोडीलाही बाद करू शकले नाहीत. दोघांनी मिळून २०० धावांची भागीदारी केली. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. गुजरातच्या सलामी जोडीने एकही विकेट न गमावता २०० धावांचा यशस्वी पाठलाग केला.
दिल्लीने केल्या १९९ धावा
या सामन्यात दिल्लीचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. दिल्लीकडून केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. त्याने ६५ चेंडूंचा सामना करत ११२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि १४ चौकार मारले. तर अभिषेक पोरेलने ३० धावा चोपल्या. शेवटी अक्षर पटेलने २५ आणि ट्रिस्टन स्टब्सने २१ धावा करत संघाची धावसंख्या १९९ वर पोहोचवली.