गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात अखेरीस आपला पहिला विजय मिळवला आहे. अबु धाबीच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ४९ धावांनी मात केली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वात महागडी बोली लावण्यात आलेला पॅट कमिन्स हा या सामन्याचं प्रमुख आकर्षण होता. कोलकाता नाईट रायडर्सने कमिन्सला संघात स्थान दिलं. परंतू त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पॅट कमिन्सच्या ३ षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी ४९ धावा कुटल्या. यानंतर कमिन्सवर सोशल मीडियावर टीका करण्यात आली. परंतू संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक कमिन्सच्या मदतीला धावून आला आहे.

“एका सामन्यातील कामगिरीवरुन त्याला पारखणं हे आता खूप चुकीचं ठरेल. आपला क्वारंटाइन कालावधी संपवून तो नुकताच संघात खेळण्यासाठी दाखल झाला. त्याला खेळण्याची परवानगी मिळाली तेव्हा दुपारचे साडेतीन, चार वाजले होते. तो संघात खेळण्यासाठी उपलब्ध होता यातच आम्हाला आनंद आहे. त्यामुळे या सामन्यातील कामगिरीवरुन त्याची परीक्षा करणं चुकीचं ठरेल.” सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत कार्तिकने कमिन्सची पाठराखण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमिन्स जागतिक क्रमवारीतला अव्वल गोलंदाज आहे. मला खात्री आहे तो नक्कीच चांगलं पुनरागमन करेल असा आत्मविश्वासही कार्तिकने व्यक्त केला. गोलंदाजीत कमिन्सला कमाल दाखवता आली नसली तरीही फलंदाजीत त्याने षटकारांची आतिषबाजी करत आपली कमाल दाखवली. परंतू संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. यामुळे पुढील सामन्यांमध्ये कमिन्स कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.