IPLच्या हंगामात चांगली सुरूवात मिळाल्यानंतर आता पंजाबच्या संघाची खराब कामगिरी होऊ लागली आहे. चेन्नईकडून १० गडी राखून दारूण पराभव स्वीकारल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघानेही पंजाबला ६९ धावांनी मात दिली. हैदराबादने दिलेलं २०२ धावांचं आव्हान पंजाबच्या संघाला पेलवलं नाही. निकोलस पूरनच्या झुंजार खेळीच्या बळावर पंजाबने कसंबसं शतक गाठलं, पण १३२ धावांवर त्यांचा संघ बाद झाला. IPLच्या लिलावात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरलेला ग्लेन मॅक्सवेल पुन्हा अपयशी ठरला. त्याने १२ चेंडूत ७ धावा केल्या. त्यामुळे पंजाबच्या माजी प्रशिक्षकाने त्याच्यावर हल्लाबोल केला.

“मॅक्सवेलला नक्की कशाप्रकारचा खेळ हवा असतो हेच कळेनासं झालंय. हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात सलामीचे खेळाडू झटपट बाद झाले. खूप षटकं शिल्लक होती. पण तो मॅक्सवेल अपयशी ठरला. सुरूवातीच्या सामन्यात त्याला चांगलं व्यासपीठ मिळालं होतं. शेवटच्या षटकांत केवळ फटकेबाजी करायची गरज होती, तेव्हाही त्याला ती कामगिरी झेपली नाही. खेळताना तो नक्की काय विचार करत असतो काही कळत नाही. प्रत्येकवेळी त्याला लिलावात भलीमोठी रक्कम देऊन विकत घेतलं जातं आणि दरवेळी तो खराबच खेळून दाखवतो. तरीदेखील सगळे संघ मॅक्सवेलच्या मागे कशाला धावत सुटतात खरंच कळत नाही”, असं पंजाबचा माजी प्रशिक्षक विरेंद्र सेहवाग म्हणाला.

पुढच्या वेळच्या लिलावात कदाचित त्याची किंमत कमी होईल. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याची किंमत १० कोटींवरून अंदाजे १-२ कोटींवर येईल. आणि खरंतर त्याची तितकीच किंमत असायला हवी. संघमालकांनी हे लक्षात ठेवायला हवं की त्याने शेवटचं अर्धशतक २०१६मध्ये केलं होतं. हैदराबादविरूद्धच्या सामन्यातदेखील त्याने फक्त पूरनला साथ दिली असती, तर पूरनने पंजाबसाठी सामना जिंकला असता”, असं सेहवाग म्हणाला.