अलीकडेच, द हंड्रेड लीगमध्ये २७ षटकार आणि २२ चौकारांसह ३५८ धावा करणाऱ्या इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघ, काउंटी टीम लँकशायर तसेच आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचे टेन्शन वाढले आहे. खरं तर, वारविकशायर आणि लँकशायर दरम्यान सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन एक सामन्यात क्षेत्ररक्षण करताना लिव्हिंगस्टोनला दुखापत झाली.

चेंडू सीमापार जाण्यापासून रोखताना लिव्हिंगस्टोनच्या खांद्याला दुखापत झाली. चौकार वाचवण्याचा प्रयत्न करत असताना, तो त्याच्या खांद्यावर पडला आणि त्यानंतर तो वेदनेने विव्हळत होता. लिव्हिंगस्टोन मैदानाबाहेर गेला आणि त्याची जागा रिचर्ड ग्लेसनने घेतली. त्याच्या दुखापतीबद्दल संघाकडून आतापर्यंत कोणतेही अपडेट आलेले नाही, परंतु यामुळे वरील तीन संघांचा ताण वाढला आहे.

हेही वाचा – “..आता भरपूर पैसे मिळतील”, इंग्लंडच्या मायकेल वॉनला मिळाली टीम इंडियाची जर्सी!

आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी भारताविरुद्धच्या ओव्हल कसोटीत त्याचा इंग्लिश संघात समावेश करणार असल्याची चर्चा होती. जोस बटलर पितृत्वाच्या रजेमुळे चौथ्या कसोटीत खेळणार नाही. अशा परिस्थितीत इंग्लंडमध्ये कॉमेंट्री करणारा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने इंग्लंडला बटलरऐवजी लिव्हिंगस्टोनला संघात आणण्याचा सल्ला दिला होता.