शनिवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगला फक्त २५ टक्केच प्रेक्षक मैदानात उपस्थित असतील, असं आयोजकांनी सांगितलं आहे. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामान्याने यंदाच्या आयपीएलची सुरूवात होत आहे.
हा सामना अविस्मरणीय ठरणार आहे. कारण करोनाच्या जागतिक महामारीनंतर पहिल्यांदाच प्रेक्षक मैदानात येऊन सामना बघणार आहेत. हे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातल्या मैदानांवर खेळले जातील. मात्र यावेळी करोना नियमांमुळे केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असेल. रिपब्लिक वर्ल्डने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स अशा दोन नव्या टीम्ससह ७४ सामने खेळले जातील. ज्यापैकी ७० सामने मुंबईतल्या वानखेडे तसंच ब्राबोर्न स्टेडियमवर खेलले जातील. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्यातल्या एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवरही काही सामने होतील.
जवळपास वर्षभरानंतर आयपीएल भारतात होणार आहे. २०२१ मध्ये भारतातल्या काही बंदिस्त ठिकाणी आयपीएलचे सामने होणार होते. मात्र सातत्याने वाढणाऱ्या करोना प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा थांबवण्यात आली. बायो-बबल वापरुनही करोनाची लागण व्हायला लागली, त्यामुळे भारतात स्पर्धा थांबवण्यात आली. त्यानंतर काही कालावधीनंतर उर्वरित सामने दुबईमध्ये खेळण्यात आले. २०२० सालची आयपीएल स्पर्धाही दुबईमध्येच खेळली गेली.