‘क्रिकेट का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या हंगामाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. साधारण दीड महिन्यासाठी सुरु होणाऱ्या या क्रिकेटच्या उत्साहात सहभागी होणारे संघही त्यांच्या परिने या हंगामाची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे दिल्ली डेअरडेविल्सची या संघाची. आयपीएलच्या ११ व्या हंगामासाठी दिल्लीच्या संघाने नव्या जर्सीचं अनावरण केलं असून, सोशल मीडिया आणि क्रिडा वर्तुळात अनेकांनी या जर्सीला पसंती दिली आहे.
दिल्लीच्या संघाचे कार्यकारी अधिकारी हेमंत दुआ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही जर्सीचे फोटो पोस्ट केले असून, त्या जर्सीवर असणाऱ्या काही गोष्टी स्पष्ट केल्या. गेल्या काही हंगांमांप्रमाणेच यंदाच्या वेळच्या जर्सीत निळा आणि लाल या रंगांचा जास्त वापर करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. ज्यामध्ये केशरी रंगाचाही वापर करण्यात आला आहे. यामध्ये वापरण्यात आलेला केशरी रंग उगवत्या सूर्याचं प्रतीक असल्याचं दुआ यांनी त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट केलं आहे.
पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग
https://twitter.com/inspiranti/status/971349093397225473
आयपीएलच्या या हंगामात क्रिडारसिकांचं लक्ष लागून राहणार आहे. कारण, डावखुरा फलंदाज गौतम गंभीर सात वर्षांनंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सची नेतृत्व करताना दिसणार आहे. गौतम गंभीर यापूर्वी २००८, २००९ आणि २०१० मध्ये दिल्लीच्या संघात होता. त्यामुळे आता संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास आणि गंभीरच्या खांद्यावर सोपवलेली जबाबदारी पाहता दिल्लीचा संघ आयपीएलमध्ये कुठवर मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.