निर्धारीत षटकांत मुंबईने सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवल्यानंतर, दुबईच्या मैदानावर आयपीएलच्या तेराव्या हंगामातली दुसरी सुपरओव्हर खेळवण्यात आली. RCB कडून नवदीप सैनीने मैदानात स्थिरावलेल्या पोलार्डसमोर टिच्चून मारा करत अवघ्या ७ धावा देत, आपल्या संघाला विजयासाठी ८ धावांचं आव्हान दिलं. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचं गोलंदाजीतलं ब्रम्हास्त्र मानलं जातो. याच कारणासाठी कर्णधार रोहित शर्माने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात सुपरओव्हरची जबाबदारी बुमराहवर सोपवली.
जसप्रीत बुमराहच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात दोन सुपरओव्हरमध्ये बाजी मारली आहे. २०१७ साली गुजरातविरुद्धच्या सामन्यात बुमराहने सुपरओव्हरमध्ये ६ धावा दिल्या होत्या. यानंतर २०१९ साली बुमराहने सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सुपरओव्हरमध्ये ८ धावा दिल्या होत्या. या दोन्ही सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता. परंतू मुंबईचं हे ब्रम्हास्त्र पहिल्यांदा फोल ठरलं. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना कर्णधार विराट कोहलीने चौकार लगावत सामना RCB च्या नावावर केला.
त्याआधी इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने सामना बरोबरीत सोडवला. एका क्षणाला RCB सामन्यात बाजी मारणार असं वाटत असताना…पोलार्ड आणि किशन यांनी डेथ ओव्हर्समध्ये चौकार-षटकारांची आतिषबाजी करत सामना रंगतदार अवस्थेत आणला. विजयासाठी एका धावेत ५ धावांची गरज असताना पोलार्डने चौकार लगावल्यामुळे सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लावण्यात आला…ज्यात बंगळुरुने बाजी मारली.