युएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामावर बुकींची वक्रदृष्टी पडली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या एका खेळाडूने आपल्याला बुकींकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटकडे केली आहे. या तक्रारीनंतर ACU च्या अधिकाराऱ्यांनी अधिक दक्षता घेत तपासाला सुरुवात केली आहे. जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने या स्पर्धेसाठी Bio Secure Bubble तयार केल आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्ती खेळाडूंच्या संपर्कात येण्याची संधी कमी आहे. पण युएई हे बुकींचं नंदनवन मानलं जातं. त्यातच एका खेळाडूशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाल्याचं लक्षात आल्यानंतर ACU ने अधिक खबरदारी घेण्याचं ठरवलं आहे.

बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटचे प्रमुख अजित सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “एका खेळाडूला बुकीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी थोडा वेळ जाण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंचं नाव जाहीर न करण्याचा निर्णय अँटी करप्शन युनिटने घेतला आहे.” राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महा संचालक म्हणून काम पाहिलेल्या अजित सिंह यांनी माहिती दिली.

सर्वात महत्वाची आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे ज्या खेळाडूला बुकीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्याला यात काहीतरी काळंबेरं असल्याचं जाणवलं. संशय आल्यानंतर त्याने लगेच ACU कडे याची माहिती दिली. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला अँटी करप्शन आणि बुकींपासून असणाऱ्या धोक्याची सर्व माहिती देण्यात आलेली असल्याचं सिंह यांनी स्पष्ट केलं. सिंह यांच्यासह ८ जणांचं पथक आयपीएलमध्ये गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेत आहे.