आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलामीच्या दोन सामन्यांमध्ये धडाकेबाज अर्धशतकी खेळी करुन संजू सॅमसनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चेन्नईविरुद्ध ७४ आणि पंजाबविरुद्ध ८५ धावांची खेळी सॅमसनने केली होती. या खेळीनंतर सोशल मीडियावर सर्वच स्तरातून संजू सॅमसनचं कौतुक होत होतं. अनेकांनी ऋषभ पंतच्या जागी संघात सॅमसनला स्थान द्यायला हवं अशीही मागणी केली. मात्र यानंतर संजू सॅमसनच्या बॅटमधून धावांचा ओघ पूर्णपणे आटलेला आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळून १५९ धावा करणाऱ्या संजू सॅमसनने नंतरच्या सात धावांमध्ये फक्त ७७ धावा केल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या सात सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांत संजू दोन आकडी धावसंख्या गाठू शकला आहे. याव्यतिरीक्त उर्वरित सर्व सामन्यांमध्ये संजूच्या पदरी अपयशच आलं आहे.

रॉयलल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यात राजस्थानने आश्वासक सुरुवात केली होती. बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा या जोडीने सलामीच्या जोडीसाठी ५० धावांची भागीदारी केली. यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅमसनने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र चहलने आपल्या एकाच षटकात उथप्पा आणि सॅमसनला माघारी धाडत राजस्थानला मोठे धक्के दिले. सॅमसन ९ धावा काढून बाद झाला.