आयपीएलच्या पंधाराव्या हंगामातील दहावा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. दिल्ली कॅपिट्लस आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या या लढतीत गुजरातने दिल्लीला धूळ चारली. गुजरातने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य दिल्लीला गाठता आले नाही. या सामन्यात दिल्लीचा ललीत यादव बाद होतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या सामन्यात पंचाने चूक केली आहे, असे म्हटले जातेय.

ललित यादवला धावबाद करताना नेमकं काय घडलं ?

गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची ९५ धावांवर तीन गडी बाद अशी स्थिती झाली. दरम्यान, ऋषभ पंत आणि ललित यादव ही जोडी मैदानावर चांगला खेळ करत होती. मात्र १२ व्या षटकात ललित यादव धावबाद झाला. यावेळी बारावे षटक विजय शंकर टाकत असताना ललित यादव चोरटी धाव घेण्यासाठी धावला. मात्र यादव आणि पंत गोंधळल्यामुळे अभिनव मनोहरने विजय शंकरकडे चेंडू फेकला. मात्र ललित यादवला बाद करताना विजय शंकरचा एक पाय स्टंप्सला लागला. त्यामुळे चेंडू स्टंप्सला लावण्याअगोदारच स्टंप्सवरची एक बेल पडली. त्यानंतर शंकरने चेंडूच्या मदतीने दुसरी बेल उडवली. हे सर्व घडल्यानंतर पंचाने यादवला धावबाद म्हणून जाहीर केले. ललित यादव बाद झाल्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सने १७२ धावांचे दिलेले लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला गाठता आले नाही. दिल्लीला २० षटकांत १५७ धावा करता आल्या. या सामन्यात विजय संपादन केल्यानंतर गुजरात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.