पीटीआय, मुंबई : दिल्ली कॅपिटल्स संघातील पाच जणांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा बुधवारी होणारा पंजाब किंग्जविरुद्धचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामना पुण्याऐवजी मुंबईत खेळवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. जैवसुरक्षा परिघात आणखी कोणत्याही व्यक्तीला करोनाची लागण झालेली असल्यास त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली-पंजाब यांच्यातील बुधवारचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श, फिजिओ पॅट्रिक फरहार्ट, मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, संघाचे डॉक्टर अभिजित साळवी आणि समाजमाध्यम प्रतिनिधी आकाश माने या दिल्ली कॅपिटल्स पथकातील सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. ‘‘दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात २० एप्रिलला होणार सामना क्रमांक ३२ हा पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमहून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला आहे. कारण पुण्याच्या सामन्यासाठी संघाला बसने प्रवास करावा लागेल. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.

दिल्लीविरुद्ध सामन्यासाठी पंजाब किंग्जचा संघ मंगळवारी पुण्याकडे रवाना होणार होता. परंतु त्यांना मुंबईतच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  सोमवारी मार्शसह तिघांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत आला आहे. घसा खवखवणे आणि सौम्य ताप या लक्षणांमुळे मार्शला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फरहार्ट यांना गेल्या आठवडय़ात शुक्रवारी करोनाची लागण झाली आहे. गेल्या हंगामात जैवसुरक्षा परिघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे ‘आयपीएल’ मध्यावर स्थगित करावे लागले होते. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात उर्वरित सामने खेळवावे लागले होते.

  • करोनाबाधित दिल्ली संघाच्या सदस्यांना वैद्यकीय देखरेखीखाली अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
  • यापुढे सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यांच्या पुन्हा चाचण्या घेण्यात येणार आहेत. या दोन्ही चाचण्या नकारात्मक आल्यास त्यांना दिल्ली कॅपिटल्सच्या जैवसुरक्षा परिघात सामील होता येईल.
  • १६ एप्रिलपासून दिल्लीच्या संपूर्ण पथकाची दररोज आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे.
  • १९ एप्रिलला (मंगळवारी) झालेल्या चौथ्या फेरीत उर्वरित सर्वाच्या चाचण्यांचे निकाल नकारात्मक आले आहेत.
  • आता २० एप्रिलला (बुधवारी) सकाळी दिल्ली चमूच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांमध्ये सर्वाचे निकाल नकारात्मक आल्यास सामना होऊ शकेल.

दिल्लीची आज पंजाबशी झुंज

करोनासंकटाचे आव्हान मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सला बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जशी झुंजावे लागणार आहे. दिल्लीने आतापर्यंतच्या पाच सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत, तर दोन सामन्यांत पराभव पत्करले आहेत. पंजाबने सहापैकी तीन सामने जिंकले आहेत, तर तीन सामने गमावले आहेत.

मार्शच्या जागी सर्फराज किंवा मनदीप

दिल्लीच्या भक्कम फलंदाजीच्या फळीत डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋषभ पंत यांचा समावेश आहे. पाच सामन्यांत ११ बळी घेणाऱ्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादववर दिल्लीच्या गोलंदाजीची मदार आहे. शार्दूल ठाकूर, खलील अहमद आणि अक्षर पटेल अशी गोलंदाजीची फळी त्यांच्याकडे आहे. मुस्ताफिझूर रेहमानने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात ४८ धावा दिल्या होत्या. मार्शच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकासाठी मनदीप सिंग किंवा सर्फराज खान हे पर्याय उपलब्ध आहेत.

मयांकचे पुनरागमन

पंजाबची शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि शाहरुख खान यांच्यावर मदार आहे. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे नियमित संघनायक मयांक अगरवाल सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. परंतु मयांकच्या पुनरागमनामुळे पंजाबच्या सामर्थ्यांत भर पडली आहे. धवनच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. जितेश शर्मानेही अपेक्षा उंचावल्या आहेत. पंजाबच्या गोलंदाजीची धुरा कॅगिसो रबाडावर आहे. वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, राहुल चहर (९ बळी) असे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. अष्टपैलू वेगवान गोलंदाज ओडीन स्मिथकडूनही त्यांना मोठय़ा अपेक्षा आहेत.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्यांसह)
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 delhi will play mumbai instead pune corona infection ysh
First published on: 20-04-2022 at 00:02 IST