रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा  वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याच्या बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. अर्चिता पटेल यांचे ९ एप्रिल रोजी निधन झाले होते. निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर सामन्यानंतर हर्षल त्याच्या घरी गेला होता. बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर हर्षलला क्वारंटाईनमुळे तीन दिवस संघापासून दूर राहावे लागले. मात्र, त्यानंतर तो पुन्हा संघात सामील झाला असून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही तो संघाचा भाग होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षल १६ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि संघाच्या विजयातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतर भावूक हर्षल पटेलने त्याच्या दिवंगत बहिणीसाठी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये ३१ वर्षीय हर्षलने दोघांमधील क्षणांची आठवण केली आहे.

“ताई, तू आमच्या आयुष्यातील सर्वात उदार आणि आनंदी व्यक्ती होतीस. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन तू अविश्वसनीय अडचणींचा सामना केला. जेव्हा मी तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तू मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते आणि माझी काळजी करू नका असे म्हटले. या शब्दांमुळेच काल रात्री मी मैदानात परत येऊ शकलो,” असे हर्षलने म्हटले आहे.

“आता मी तुझे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी एवढेच करू शकतो. तुला माझा अभिमान वाटेल ते सर्व मी करत राहीन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येईल, चांगल्या आणि वाईट. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या आत्म्याला शांती लाभो,” असे पुढे हर्षलने म्हटले आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर हर्षल पटेलला त्याच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळाली. आयपीएलचे मागील दोन हंगाम हर्षल पटेलसाठी चांगलेच गेले. डेथ ओव्हर्समध्ये तो प्रभावी गोलंदाजी करतो.

दरम्यान, हर्षल आयपीएल २०२१ मध्ये ३२ विकेट्ससह पर्पल कॅप विजेता होता. मात्र, या मोसमात आतापर्यंत त्याने पाच सामन्यांत केवळ सहा विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी आरसीबीने आयपीएलच्या लिलावात हर्षलला तब्बल १० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. आयपीएल २०२१ मध्ये, आरसीबीने  २० लाखांच्या मूळ किमतीत हर्षल पटेलचा त्यांच्या संघात समावेश केला. गेल्या मोसमात सर्वाधिक ३२ विकेट्स घेणाऱ्या या खेळाडूने सांगितले होते की तो २० लाखांपेक्षा जास्त रकमेचा पात्र आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 harshal patel gets emotional after sister funeral writes emotional post on social media abn
First published on: 18-04-2022 at 15:42 IST