पीटीआय, नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट सर्वोत्तम फिजिओंपैकी एक आहे. ‘आयपीएल’च्या लिलावापूर्वी खेळाडू अचानकच तंदुरुस्त होतात, अशी कोपरखळी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी मारली. ‘आयपीएल’च्या हंगामापूर्वी खेळाडू दुखापतीतून सावरून मैदानात परतल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. याबाबत क्रिकेटवर्तुळात आणि चाहत्यांमध्ये कायमच चर्चा केली जाते. मात्र आता शास्त्री यांनी त्यांच्या वेगळय़ा शैलीत खेळाडूंवर टिपण्णी केली आहे. ‘‘जगातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० लीगमध्ये ‘आयपीएल’चा अव्वल क्रमांक लागतो. तसेच ‘आयपीएल’ सर्वोत्तम फिजिओंपैकी एक आहे. लिलावापूर्वी प्रत्येकच खेळाडूला पूर्णपणे तंदुरुस्त व्हायचे असते. ते ‘आयपीएल’मध्ये खेळण्यासाठी सर्वच खेळाडू फार आतुर असतात,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.
भारताचा भविष्यातील कर्णधार सापडेल!
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मात्र भविष्याच्या दृष्टीने भारताला नवे कर्णधार शोधावे लागतील आणि यासाठी ‘आयपीएल’ फायदेशीर ठरेल, अशी शास्त्री यांना आशा आहे. ‘‘भारताला भविष्यातील कर्णधार ‘आयपीएल’मधून सापडू शकेल. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्यावर सर्वाची नजर असेल,’’ असे शास्त्री म्हणाले.