आयपीएलचा १५ वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ मार्चपासून या हंगामाची सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. मात्र सामना काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना आता केकेआरला चांगलाच धक्का बसला आहे. कारण केकेआरचे पॅट कमिन्स आणि अॅरॉन फिन्च हो दोन दिग्गज खेळाडू सुरुवातीचे पाच सामने खेळू शकणार नाहीत.

अॅरॉन फिन्च आणि पॅट कमिन्स हे दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात व्यस्त आहेत. हे दोन्ही खेळाडू आपला देश ऑस्ट्रेलियाकडून खेळत असून येत्या ५ एप्रिलपर्यंत हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानमध्येच व्यस्त असतील. तोपर्यंत ते केकेआरकडून खेळू शकणार नाहीत. विशेष म्हणजे केकेआर फ्रेंचायजीने या दोन खेळाडूंसाठी तब्बल ९.७५ कोटी रुपये मोजलेले आहेत. लिलावात पॅट कमिन्सला ७.२५ कोटी रुपयांना खेरदी करण्यात आलेलं आहे. तर अॅलेक्स हेल्सने आयपीएल २०२२ मधून माघार घेतल्यानंतर अॅरॉन फिन्चला दीड कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं.

५ एप्रिलनंतर ते भारतात येण्याची शक्यता आहे. १० एप्रिल रोजी केकेआर आपला पाचवा सामना खेळेल. मात्र भारतात आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून दोन्ही खेळाडूंना काही काळासाठी बायोबबलपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे ५ एप्रिल रोजीच्या सामन्यात फिन्च आणि कमिन्स प्लेईंग इलेव्हनचा भाग होऊ शकणार नाहीत.

या दोन्ही खेळाडूंच्या उपस्थितीबद्दल केकेआरचे मार्गदर्शक डेविड हसी यांनी अधिक माहिती दिली आहे. “कोणत्याही सामन्यादरम्यान मजबूत संघ मैदानात उतरावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्येक खेळाडू आपल्या देशाच्या संघासाठी खेळण्याला प्राधान्य देतो. प्रत्येक खेळाडूने तसं करण्यात काही गैर नाही. त्यामुळे फिन्च आणि कमिन्स भारतात येताच कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून मैदानात उतरतील,” असे डेविड हसी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, फिन्च आणि कमिन्ससारखे दिग्गज खेळाडू ताफ्यात नसल्यामुळे चेन्नईचा सामना करण्यासाठी केकेआरपुढे मजबूत संघ तयार करण्याचे आव्हान असेल. यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यरचाही कस लागणार आहे.