आयपीएल टी-२० स्पर्धेचा १५ वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कोलकाता नाईट रायडर्स हा संघ गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करणार आहे. यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद श्रेयस अय्यर भूषवणार असून त्याला १२.२५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलंय. त्याच्या नेतृत्वात कोलकाता संघ आयपीएल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या पहिल्याच सामन्यात कोलकाताला विजय मिळणार का हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
२०१२ आणि २०१४ अशा दोन वेळा कोलकाताने आयपीएल टी-२० च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे. या संघाने आतापर्यंतच्या हंगामात बहारदार खेळ करुन दाखवलेला आहे. यावेळीदेखील चांगली कामगिरी करुन संघाला फायनलपर्यंत नेण्याकडे श्रेयसचं लक्ष्य असणार आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि सुनिल नरेन यांना रिटेने केलेलं आहे. यावेळी लिलावात कोलकाता संघाने आपल्या ताफ्यात एकूण २१ खेळाडू घेतलेले आहेत.
वचपा काढण्याची केकेआरकडे संधी
केकेआर आपल्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करणार आहे. त्यामुळे संघाला आपला उत्साह कायम ठेवावा लागेल. तर महेंद्रसिंह धोनीसारख्या कसलेल्या कर्णधाराच्या डावपेचांना तेवढ्याच क्षमतेने श्रेयस अय्यरल तोंड द्यावं लागणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईने केकेआरला पराभूत केलं होतं. आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी केकेआरकडे आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाला सामने सुरु होण्याआधीच मोठे धक्के बसले आहेत. अलेक्स हेल्सने यापूर्वीच आयपीएल २०२२ मधून माघार घेतलेली आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून अरनॉन फिंचकडे पाहिले जात आहे. मात्र पॅट कमिन्स आणि अरनॉन फिन्च हे दोघेही दिग्गज खेळाडू सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. त्यामुळे अलेक्स हेल्स, पॅट कमिन्स, आणि अरनॉन फिन्च यासारखे दिग्गज खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे केकेआरला आपला तगडा प्लेइंग इलेव्हन संघ चेन्नईविरोधात तसेच पुढेच्या काही सामन्यांत उभा करता येणार नाही. त्यामुळे चेन्नईसारख्या तगड्या संघाशी दोन हात करायचे असतील तर तेवढ्याच क्षमतेचा संघ तयार करण्याचे आव्हान केकेआरपुढे असणार आहे.
केकेआर संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
व्यंकटेश अय्यर, नितिश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनिल नरेन, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, शिवम मावी
केकेआर संघातील एकूण खेळाडू
श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, रमेश कुमार, उमेश यादव, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, सुनील नारायण, नितीश राणा, शिवम मावी, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, अशोक शर्मा , अभिजीत तोमर, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजित, अशोक शर्मा, प्रथम सिंग, सॅम बिलिंग्ज, अॅलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, अमन खान, उमेश यादव