scorecardresearch

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : मोठे बदल अटळ! ; आठव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक जयवर्धनेचे संकेत

‘आयपीएल’ इतिहासात सर्वाधिक पाच जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.

मुंबई : तारांकित फलंदाजी असतानाही सलग आठ पराभव पत्करल्यामुळे आता मोठे बदल अटळ असल्याचे संकेत मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने दिले आहेत.

‘आयपीएल’ इतिहासात सर्वाधिक पाच जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेत हा संघ तळाच्या स्थानावर आहे. रविवारी लखनऊ सुपर जायंट्सकडूनही त्यांचा पराभव झाला.

स्पर्धेत पुढे जाताना फलंदाजीच्या फळीत आवश्यक बदलाची आवश्यकता आहे का, या प्रश्नाला पत्रकार परिषदेत उत्तर देताना जयवर्धने म्हणाला, ‘‘चांगला प्रश्न. आढावा घेण्याची नक्कीच गरज आहे. मी अन्य मार्गदर्शकांशी चर्चा करून योग्य योजना आखू.’’

‘‘फलंदाजी ही यंदाच्या हंगामातील अपयशाचे प्रमुख कारण आहे. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवरही आमची कामगिरी खराब झाली. अनुभवी खेळाडूंनी याआधीच्या हंगामांमध्ये अनेकदा परिस्थितीनुरूप कामगिरी बजावली आहे. त्यामुळे संघाचा समतोल साधण्यासाठी बदलाची आवश्यकता असल्यास आम्ही ते नक्की करू,’’ असे जयवर्धनेने सांगितले. कर्णधार रोहित शर्माकडून दर्जाला साजेशी फलंदाजी या हंगामात झालेली नाही. अनुभवी किरॉन पोलार्डही अपेक्षांची पूर्तता करू शकलेला नाही.

इशानबाबत चिंता

सलामीवीर इशान किशनच्या खालावलेल्या कामगिरीबाबत जयवर्धनेने चिंता व्यक्त केली आहे. पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतके झळकावणाऱ्या इशानच्या धावांचा आलेख त्यानंतर वेगाने ढासळला. याबाबत जयवर्धने म्हणाला, ‘‘इशान धावांसाठी झगडताना आढळत आहे. आम्ही त्याच्या नैसर्गिक खेळावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतो. परंतु आता त्याच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे.’’ चालू वर्षांच्या पूर्वार्धात झालेल्या ‘आयपीएल’ महालिलावात मुंबईने इशानवर १५.२५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

आम्ही यंदाच्या हंगामात अद्याप सर्वोत्तम कामगिरी बजावू शकलेलो नाही. पण असे घडत असते. क्रीडाक्षेत्रातील अनेक महासत्ता या कालखंडातून गेल्या आहेत. माझे मुंबई इंडियन्स संघावर आणि तेथील वातावरणावर अतिशय प्रेम आहे. या कठीण काळातही पाठबळ देणाऱ्या शुभेच्छुकांचा मी आभारी आहे.

रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचा कर्णधार

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 mahela jayawardene mumbai indians coach hints at few changes after eighth defeat zws

ताज्या बातम्या