लखनऊचा १८ धावांनी विजय; राहुलचे नाबाद शतक, आवेशचा भेदक मारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तसंस्था, मुंबई : पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या यंदाच्या हंगामामध्ये शनिवारी सलग सहावा पराभव पत्करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सने चौथ्या विजयाची नोंद करताना मुंबईला १८ धावांनी हरवले. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने शतकी ‘आयपीएल’ सामन्यात साकारलेल्या नाबाद शतकाच्या बळावर लखनऊने ४ बाद १९९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मग आवेश खानच्या (३/३०) भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईला ९ बाद १८१ धावांवर रोखले.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुलने ६० चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांनिशी नाबाद १०३ धावा काढून लखनऊला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. राहुलने क्विंटन डीकॉकच्या (१३ चेंडूंत २४ धावा) साथीने ५२ धावांची सलामी दिली. मग दुसऱ्या गडय़ासाठी मनीष पांडे (२९ चेंडूंत ३८ धावा) सोबत ७२ धावांची भागीदारी केली, तर दीपक हुडासह (८ चेंडूंत १५ धावा) चौथ्या गडय़ासाठी ४२ धावांची भागीदारी केली.  अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवण्याची रोहितची रणनीती अपयशी ठरली. डावखुरा फिरकी गोलंदाज फॅबियन अ‍ॅलनच्या गोलंदाजीवर लखनऊने ४६ धावा काढल्या. जसप्रीत बुमराने (४ षटकांत २४ धावा) आपली भूमिका चोख बजावली. टायमल मिल्स (३ षटकांत ५४ धावा) महागडा ठरला.

विजयासाठी दोनशे धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. रोहित (६)  आणि इशान किशन (१३) यांनी निराशा केली. पण डेवाल्ड ब्रेव्हिस (३१), सूर्यकुमार यादव (३७), तिलक वर्मा (२६) आणि किरॉन पोलार्ड (२५) यांनी मुंबईचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जेसन होल्डरच्या १९व्या षटकात १७ धावा काढत मुंबईने आशा जिवंत राखल्या. अखेरच्या षटकात मुंबईला २६ धावांची आवश्यकता होती. पण या षटकात दुष्मंता चमिराने फक्त सहा धावा देत दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

लखनऊ सुपर जायंट्स : २० षटकांत ४ बाद १९९ (केएल राहुल नाबाद १०३, मनीष पांडे ३८; जयदेव उनाडकट २/३२) विजयी वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ९ बाद १८१ (सूर्यकुमार यादव ३७, डेवाल्ड ब्रेव्हिस ३१; आवेश खान ३/३०)

जोस बटलरनंतर राहुलने यंदाच्या ‘आयपीएल’मधील दुसरे शतक साकारले. ही दोन्ही शतके मुंबईविरुद्ध झळकावली आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mumbai sixth consecutive defeat lucknow rahul unbeaten century penetrating passion ysh
First published on: 17-04-2022 at 00:02 IST