आयपीएल ( IPL ) मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनासाठी (Suresh Raina) कोणीही रस दाखवलेला नव्हता. चेन्नई सुपर किंग्जसह ( Chennai Super Kings ) कोणत्याही संघाने रैनासाठी बोली लावली नाही. त्यातच रैनाने निवृत्तीही जाहिर केलेली नाही. तेव्हा रैना आता पुढे काय करणार याची उत्सुकता होती. आयपीएलमधील एखाद्या टीममधील खेळाडूची जागा ऐनवेळी रैना घेऊ शकतो अशीही चर्चा रंगू लागली होती. अशी चर्चा असतांनाच सुरेश रैना पहिल्यांदाच समालोचकांच्या भुमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आयपीएलतर्फे वेगवेगळ्या भाषेसाठी समालोचकांची ५० पेक्षा जास्त जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये हिंदी भाषेसाठी सुरेश रैनाच्या नावाचा समावेश समालोचक म्हणून करण्यात आला आहे.

सुरेश रैनासह माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे सुद्धा पुन्हा एकदा समालोचकाच्या भुमिकेत दिसणार असून शास्त्री हे हिंदीमध्ये समालोचन करणार आहेत. तर आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, निखील चोप्रा, किरण मोरे ही काही प्रमुख नावे हिंदीतल्या समालोचनासाठी निश्चित करण्यात आली आहेत. तर सुनिल गावसकर यांच्यासह हर्षा भोगले, शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, मॅथ्यु हेडन, केविन पिटर्सन या प्रमुख व्यक्ती इंग्रजीत समालोचन करणार आहेत. आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी इंग्रजी, हिंदी या दोन प्रमुख भाषांसह मराठी, तामिळ, कन्नड, मल्याणम्, तेलगू, बंगाली या भाषेसाठी समालोचकांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

सुरेश रैना हा आजही आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार खेळाडू म्हणून ओळखला जातो. रैनाने २०५ सामन्यात पाच हजार ५२८ धावा केल्या. चार वेळा आयपीएल विजेता असलेल्या चैन्नई सुपरकिंग्जचा रैना हा एक आधारस्तंभ राहिला होता. २०१६ आणि २०१७ मध्ये गुजराज लायन्सचे नेतृत्वही रैनाने केलं होतं.