Akash Madhwal vs Jasprit Bumrah: इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आकाश मधवाल स्वत: ला जसप्रीत बुमराहची जागा समजत नाही आणि संघाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यात तो खूश आहे, असे त्याने सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सांगितले. उत्तराखंडच्या अभियंता मधवालने बुधवारी रात्री ३.३ षटकात पाच धावा देत पाच बळी घेत मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या एक पाऊल जवळ नेले.

सामन्यानंतर मधवाल म्हणाला, “संघाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी बुमराहचा पर्याय नाही पण माझ्याकडून जे काही करता येईल ते करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.” चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीने चालू हंगामात वेगवान गोलंदाजांना फारसा फायदा दिला नाही, परंतु मधवालने सांगितले की त्याच्यासाठी ही खेळपट्टी वरदान ठरली.

हेही वाचा: Virat Kohli: विक्रमादित्य विराट! मेस्सी, रोनाल्डोच्या यादीत सामील होणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

मधवालने बुमराहचे मोठेपण मान्य केले

आकाशमधवाल पुढे म्हणाला, “जसप्रीतशी माझी तुलना होऊ शकत नाही. त्याचा दर्जा वेगळा आहे आणि माझा वेगळा. मला माझी तुलना कोणाशीही केलेली आवडणार नाही. तो खूप मोठा गोलंदाज आहे. पुढच्या काळात मी आणखी चांगली गोलंदाजी करून मुंबईच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न करेल. चेपॉकची विकेट चांगली होती. चेंडू थांबत नव्हता तो वेगाने बॅटवर येत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. मी एक स्विंग गोलंदाज आहे आणि योग्य लेंथवर गोलंदाजी करून विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला.”

यावर्षी आकाश मधवाल प्रथमच आयपीएल खेळताना दिसत आहे. उत्तराखंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आकाशने २०१९ मध्ये आरसीबीसाठी नेट बॉलर म्हणून देखील भूमिका बजावलेली. त्यानंतर तो मुंबई इंडियन्ससाठी नेटबॉलर म्हणून आला. त्यानंतर त्याला थेट आयपीएल खेळण्याची संधी देण्यात आली.

हेही वाचा: IPL 2023: “माझ्या मनात खूप काही आहे पण…” किंग कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकची आणखी एक पोस्ट व्हायरल

मधवाल पुढे म्हणाला की, “कर्णधार रोहित शर्माला माहित आहे की माझे स्ट्राँग पॉईंट काय आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा. यॉर्कर हा माझा स्ट्राँग पॉईंट आहे हे रोहितला माहीत होतं पण नेट सेशन आणि सराव सामन्यांदरम्यान त्याला कळलं की मी नवीन चेंडूनेही गोलंदाजी करू शकतो, त्यानुसार माझा कसा वापर करायचा हे त्याला ठाऊक होते.”