गुजरात टायटन्सचा शुबमन गिल आयपीएल २०२३मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केवळ आयपीएलच नाही तर शुबमनने या वर्षात भारतासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. गुजरातचा सलामीवीर २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याने त्या वर्षी झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजेतेपदासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्या भारतीय अंडर-१९ संघातील शुबमन व्यतिरिक्त पृथ्वी शॉ देखील खूप चर्चेत आला होता. त्याने टीम इंडियातही एन्ट्री घेतली, पण खराब फॉर्ममुळे पृथ्वीला आपले स्थान गमवावे लागले. यंदाच्या आयपीएलमध्येही पृथ्वीचा फॉर्म खूपच खराब होता. दुसरीकडे, शुबमन गुजरातचा तसेच भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. शुबमनच्या बालपणीच्या प्रशिक्षकाने पृथ्वी शॉवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शुबमनचे बालपणीचे प्रशिक्षक करसन घावरी म्हणाला, “पृथ्वी २०१८ साली अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या त्याच संघात होता, बरोबर? आज कुठे पृथ्वी शॉ आणि कुठे शुबमन गिल? ते दोन वेगवेगळ्या श्रेणीचे फलंदाज आहेत. शॉला वाटते की तो एक स्टार आहे आणि त्याला कोणी हात लावू शकत नाही. परंतु त्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर, तुम्ही जरी टी२०, वन डे, कसोटी सामने किंवा अगदी रणजी ट्रॉफी खेळत असलात तरी, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला फक्त एक चेंडू आवश्यक आहे.”

हेही वाचा: IPL 2023 Prize Money: विजेता संघ होणार मालामाल! उदयोन्मुख खेळाडूंवरही होणार कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या

वयाच्या ११व्या वर्षापासून गिलला प्रशिक्षण देणारा घावरी म्हणाला की, “सर्वोच्च स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शिस्त आणि स्वभाव आवश्यक आहे. हे दोन्ही गुण दाखवण्यासाठी शॉने खूप धडपड केली आहे. मात्र, तो त्यात अपयशी झाला. त्याने केवळ भारतासाठीच नाही तर आयपीएल फ्रँचायझींसाठीही त्याच्या प्रतिभेच्या विरुद्ध कामगिरी केली आहे.” घावरी पुढे म्हणाला, “तुम्हाला शिस्त आणि चांगला फॉर्म, हवा आहे. जो तुम्हाला सतत स्वत:वर आत्मविश्वास ठेवून काम करण्याची प्रेरणा देत असतो. तुम्हाला क्रीजवर राहण्याची गरज आहे आणि जर तुम्ही तसे केले तर अधिक धावा करू शकाल. हेच गणित पृथ्वीला कळले नाही.”

पृथ्वीने सर्व काही गमावले नाही असे सुचवून, घावरीची इच्छा आहे की त्याने त्याच्या त्रुटींवर काम करावे, कठोर परिश्रम करावे आणि भविष्यात एक मजबूत खेळाडू म्हणून उदयास यावे. तो म्हणाला, “शुबमन आणि शॉ एकाच वयाचे आहेत. आतापर्यंत शॉने काहीही गमावलेले नाही. गिलने त्याच्या त्रुटींवर काम केले आहे, तर शॉने नाही. तो अजूनही करू शकतो. त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. मैदानाबाहेरील प्रश्न, वादविवाद त्याने त्याच्या पातळीवर सोडवावे. अन्यथा, एवढी क्षमता, कौशल्य असण्यात काही अर्थ नाही.”

हेही वाचा: IPL 2023 Final: शुबमनच्या फलंदाजीला लगाम घालण्यासाठी CSKचा ‘हा’ गोलंदाज बनणार सर्वात मोठं शस्त्र, एम.एस. धोनीचा काय आहे मास्टर प्लॅन?

आयपीएल २०२३मध्ये, पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्सचे पहिले सहा सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १२, ७, ०, १५, ० आणि १३ धावा केल्या. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. अखेरच्या दोन सामन्यांत पुन्हा संघात पुनरागमन करत अर्धशतक झळकावले. मात्र, दिल्लीच्या चेन्नईविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात तो पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी पृथ्वीवर निशाणा साधला आहे. मैदानाबाहेरही पृथ्वी अनेक वादांमुळे चर्चेत राहिला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 prithvi slams shubmans coach says prithvi thinks he is a star nobody can touch him avw
First published on: 28-05-2023 at 15:02 IST