चेन्नई सुपर किंग्सचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. चेपॉकसहित आयपीएलचे सामने इतर ज्या ज्या स्टेडियममध्ये होतात तिथेही चेन्नईला पाठिंबा देण्यासाठी मोठा चाहता वर्ग उपस्थित असतो. जिथे नजर जाईल तिथे पिवळ्या रंगाची जर्सी घातलेले चाहते संघाला पाठिंबा देण्यासाठी हजर असतात.पण सध्या चेन्नई आणि माहीच्या एका चाहत्याने तर आपल्या लग्नाची पत्रिकाच चेन्नई सुपर किंग्सच्या थीमची पत्रिका बनवली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे.

तामिळनाडूतील एका जोडप्याने इन्स्टाग्रामवर ‘cskfansofficial’ हँडलवरून लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो आहेत, पहिल्या फोटोमध्ये एक जोडपे दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये एक कार्ड आहे. पहिल्या फोटोत नवविवाहित जोडपे ट्रॉफीसारखे कट-आउट पोस्टर घेऊन पोज देताना देखील दाखवले आहे ज्यावर त्या दोघांचा फोटो आहे. कार्ड लीन पर्सी आणि मार्टिन रॉबर्ट या जोडप्याची ही आमंत्रण पत्रिका आहे.

‘आयपीएल’ तिकीट पासच्या लूकमध्ये कार्डची रचना करण्यात आली आहे. यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा लोगो आहे, ज्यामध्ये वधू-वरांची नावे लिहिली आहेत. कार्डमध्ये आमंत्रणाचा तपशील देखील क्रिकेट सामन्यासारखा आहे. ज्यामध्ये ‘मॅच प्रिव्ह्यू’ आणि ‘मॅच प्रेडिक्शन’ असे शब्द लिहिलेले आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या थीममध्ये असलेली ही लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे, या दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.