IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans: केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील लखनौ संघाने गिलच्या गुजरात टायटन्सला ऑल आऊट करत ३३ धावांनी शानदार विजय मिळवला. लखनौने १६४ धावांच्या लक्ष्याचा बचाव करत गुजरातच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. आयपीएल इतिहासात प्रथमच लखनौन गुजरातचा पराभव केला. या सामन्यात लखनौ संघाचा कर्णधार आणि फलंदाज केएल राहुलने ३१ चेंडूत ३३ धावा केल्या. यासाठी संथ स्ट्राईक रेटने खेळत असल्याची टीका त्याच्यावर होत आहे. लखनौ संघाने सामन्यानंतर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे, ज्यात केएलला संरक्षण मंत्री म्हणून संबोधले आहे, पण यामागचे कारण काय आहे, जाणून घ्या.

सामन्यानंतरच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्तीने केएल राहुलला संरक्षण मंत्री म्हणून संबोधले. यानंतर एलएसजीचा सलामीवीर केएल राहुलची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तू पण माझ्या स्ट्राईक रेटची खिल्ली उडवत आहेस का, असा सवालही केएल राहुलने त्याला विचारला.

लखनौ सुपर जायंट्सने शेअर केलेला हा व्हीडिओ संघाच्या एका शानदार कामगिरी आणि विक्रमाबद्दलही सांगणारा आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती केएल राहुलला म्हणते की, मला वाटते की तुम्ही भारताचे पुढील संरक्षण मंत्री व्हावे. यावर केएल राहुल म्हणतो की मित्रा, तूही माझ्या स्ट्राईक रेटची खिल्ली उडवणार का? त्यावर ती व्यक्ती म्हणाते, अरे नाही… तुम्ही नेहमीच १६० अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी बचाव करता, म्हणूनच मी तुम्हाला संरक्षण मंत्री म्हणत आहे. हा व्हीडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

आयपीएलच्या इतिहासात तेराव्यांदा लखनौ संघाने १६० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य राखले आहे. एवढ्या कमी कालावधीत इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. लखनौ संघाचा आयपीएलमधील हा फक्त तिसरा हंगाम आहे. हीच माहिती या व्हीडिओमधून दिली आहे.

लखनौचा संघ चांगली कामगिरी करत असला तरी केएल राहुलचा स्ट्राइक रेट चिंतेचे कारण आहे. आयपीएल २०१४ मध्ये त्याने आतापर्यंत १२६ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १२८.५७ आहे. एकदा तो अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला होता, पण त्या डावातही त्याने ४४ चेंडूत ५८ धावा केल्या. याशिवाय त्याने ९ चेंडूत १५ आणि १४ चेंडूत २० धावा केल्या आहेत.

आयपीएल २०२३ पासूनच केएलची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. २०२३ च्या हंगामातील काही सामने खेळल्यानंतर त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण टूर्नामेंटमधून बाहेर पडला. २०२३ च्या आयपीएलमध्ये राहुलने ९ सामन्यांमध्ये ११३.२२ च्या स्ट्राईक रेटने २७४ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता आणि त्याची सर्वात्कृष्ट धावसंख्या ही ७४ होती.