आयपीएलमधील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळवण्यात आला. चेन्नईने चेपॉकच्या मैदानात झालेल्या या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सीएसके कडून समीर रिझवी या फलंदाजाने पदार्पण केले. त्याला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण सामन्यानंतरच्या त्याच्या एका कृतीने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. सीएसकेच्या विजयानंतर नवोदित समीर रिझवीने दिग्गज खेळाडूंची भेट घेतली. पण महत्त्वाचं म्हणजे विराटशी हस्तांदोलन करण्याआधी त्याने आदराचे प्रतीक म्हणून त्याची टोपी काढली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्जने आरसीबीवर ६ विकेट्सने विजय मिळवत या मोहिमेला सुरूवात केली. सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना हात मिळवण्यासाठी आले तेव्हा विराट कोहली समीर रिझवीसमोरा आला तेव्हा समीरने आपली टोपी काढून कोहलीशी हस्तांदोलन केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर समीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहतेही या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. समीर यानंतर ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीसोबत काढलेला फोटोही शेअर केला आहे आणि ‘Forever Legend’ असे कॅप्शन दिले आहे.

समीर रिझवी हा उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राहणारा आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने समीरवर मोठी बोली लावली होती. अनकॅप्ड खेळाडू म्हणून समीर यंदा सर्वात महागडा खेळाडू ठरला. सीएसकेने समीरला ८.४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. समीर रिझवीला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी भविष्यात तो नक्कीच फलंदाजीला येईल. समीर मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याने यूपी टी-२० लीगमध्ये एकूण ५५ षटकार ठोकले होते. त्या स्पर्धेत त्याने १० सामन्यांत ४५५ धावा केल्या ज्यात दोन शतके आहेत. आता आयपीएलमध्ये त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.