IPL 2024, Gujarat Titans vs Punjab Kings: शशांक सिंगने आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्ज गुजरात टायटन्सविरुद्ध एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. शशांक क्रीझवर आला तेव्हा पंजाबच्या विजयाची शक्यता ५ टक्क्यांहून कमी होती. २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने ७० धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. शशांकने २९ चेंडूत नाबाद ६१ धावा करत संघाला विजयाकडे नेले. पण फार कमी जणांना माहित असेल की हा ३२ वर्षीय खेळाडू मुंबईकर आहे आणि मुंबई क्रिकेट संघाकडूनही क्रिकेट खेळला आहे. शशांकच्या क्रिकेट कारकिर्दिचा आढावा पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशांक सिंहचा जन्म छत्तीसगडमधील भिलाई येथे झाला. त्याचे वडील एक आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे वडिलांच्या बदल्या होत असल्याने शशांकचे लहानपणही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. जबलपूरमध्ये शशांकच्या वडिलांची बदली झालेली असताना तो पहिल्यांदा अकादमीमध्ये जाऊन क्रिकेट खेळू लागला. शशांकला क्रिकेटपटू बनवायचं हे स्वप्न त्याच्या वडिलांच होतं. १९९६ मध्ये जेव्हा भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक गमावला तेव्हा त्याच्या वडिलांना फार दुख झालं आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं माझा मुलगा क्रिकेटपटू होणार. अन् वयाच्या सहाव्या वर्षापासून शशांकचा क्रिकेट प्रवास सुरू झाला.

शशांक १७ वर्षांचा असताना मुंबईत आला. आझाद मैदानावरील सराव हा त्याचा दिनक्रम होता. मुंबईत आल्यावर शशांकला उमगलं की क्रिकेट खेळणं आणि संधी मिळवणं किती कठीण आहे. त्यानंतर शशांकने अधिक मेहनत घेतली. २०१५ मध्ये त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली. फलंदाजीसोबतच ऑफ-स्पिन गोलंदाजी करणाऱ्या शशांकला चार हंगामात मुंबईसाठी १५ टी-२० आणि तीन लिस्ट ए सामने खेळण्याची संधी मिळाली.

हेही वाचा: IPL 2024: पंजाबने ‘चुकून’ खरेदी केलेल्या शशांकची सिंगची ८ चेंडूत २१ धावांची वादळी खेळी, वाचा लिलावात नेमकं काय झालं होतं?

मुंबई संघातून अधिक संधी न मिळाल्याने तो छत्तीसगढमध्ये गेला आणि त्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१८-१९ हंगामात पुद्दुचेरीसाठी एक लिस्ट ए सामना देखील खेळला. छत्तीसगढ संघाकडून शशांक सिंगला अधिक संधी मिळू लागल्या. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधीही मिळाली. २०२३ मध्ये, त्याने विजय हजारे ट्रॉफी सामन्यात १५० हून अधिक धावा केल्या आणि ५ विकेट घेतले, ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या डीवाय पाटील ग्रुपने आयोजित केलेल्या टी-२० स्पर्धेत, शशांक सिंगने ब गटाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्यांमध्ये दिनेश कार्तिक आणि आयुष बडोनी हे खेळाडू होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिखर धवन देखील एक वरिष्ठ खेळाडू म्हणून संघात सामील झाला आणि तोही शशांकच्या नेतृत्वाखाली खेळला. याउलट चित्र आयपीएलमध्ये पाहायला मिळाले. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील पंजाब संघात सध्या शशांक खेळताना दिसत आहे.

हा ३२ वर्षीय क्रिकेटपटू मुंबईच्या मैदानावरील एक विस्फोटक खेळी करणारा खेळाडू आहे. डीवाय पाटील ग्रुपच्या ब संघाचे प्रशिक्षक सुब्रमण्यम दोराईस्वामी म्हणाले, “शिखरने शशांकच्या खेळीचे बारकाईने निरीक्षण केले आहे आणि त्याची फलंदाजी पाहिली आहे. त्यामुळे त्याने या हंगामातील पंजाब किंग्जच्या पहिल्या सामन्यापासून त्याला खेळण्याची संधी दिली.” शशांकनेही त्याच्या कर्णधाराला निराश केले नाही आणि दिलेल्या संधीचे सोने करत संघासाठी मोठी भूमिका बजावली.

“शशांकने खरोखरच एक शानदार खेळी खेळली त्याने ज्या पद्धतीने ते षटकार मारले, ते कमाल होते. तो फार सहजतेने येणाऱ्या चेंडूवर फटकेबाजी करत होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतानाही त्याने आपली सकारात्मक मानसिकता दाखवली. तो बऱ्याच काळानंतर आयपीएलमध्ये खेळत आहे आणि तरीही तो खूप चांगला खेळला,” सामन्यानंतर धवननेही या शब्दात त्याचे कौतुक केले.

शशांकसाठी ही खेळी हंगामातील सर्वोत्तम ठरावी. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो छत्तीसगढ, पुदुच्चेरी संघांकडून खेळला आहे. आयपीएलमध्येही तो आधी सनरायझर्स हैदराबाद संघाकडे होता. यंदाच्या हंगामात मिळालेल्या संधीचं शशांकने पुरेपूर सोनं केलं आहे. अजिंक्य रहाणे आणि झहीर खान यांच्यासह अनेक नामवंत विद्यार्थ्यांना घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक दिवंगत विद्या पराडकर यांच्या हाताखाली शशांकने क्रिकेटचे धडे गिरवले.

शशांक डीवाय पाटील ग्रुपचा कर्मचारी आहे आणि तो मुख्यतः मुंबईकडून क्रिकेटमध्ये खेळतो. त्याला क्रिकेटपटू म्हणून घडवणाऱ्यांमध्ये ॲबे कुरुविला यांचाही मोठा वाटा आहे, जे भारताचा माजी वेगवान गोलंदाज होते आणि सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) जनरल मॅनेजर आहेत. “शशांक खूप प्रामाणिक आहे आणि जेव्हा तो त्याच्या राज्य (छत्तीसगड) संघाकडून जेव्हा खेळत नाही तेव्हा तो स्थानिक मुंबई क्रिकेटमध्ये खेळतो. क्लब सामने असो किंवा कॉर्पोरेट टूर्नामेंट असो शशांक हा एक उत्कृष्ट धावा करणारा फलंदाज आहे,” असे दोराईस्वामी म्हणतात.

शशांकला सर्वप्रथम आयपीएल मध्ये दिल्ली संघाने खरेदी केले. त्यानंतर २०१९ ते २०२१ पर्यंत राजस्थान रॉयल्स संघाचा तो भाग होता. दोन्ही संघांमधून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०२२ च्या आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादमध्ये होता. त्याने लॉकी फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅटट्रिक केली होती. IPL च्या ९ डावात शशांकने १७४ च्या स्ट्राईक रेटने १६० धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 shashank singh cricket career mumbai azad ground to chattisgarh and ipl 2024 gt vs pbks match winning 62 runs inning bdg
First published on: 05-04-2024 at 16:21 IST