IPL 2024, Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants: मयंक यादवच्या आयपीएलमधील कामगिरीने सर्वांवरच आपला प्रभाव पाडला आहे. मयंक यादव लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत असून त्याने आतापर्यंत खेळलेल्या अवघ्या दोन सामन्यांत आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. मयंक यादवने मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा स्वतःचा विक्रम मोडला. त्याने १५६.७ किमी प्रति तास वेगाचा चेंडू टाकला आहे. मयंकच्या गोलंदाजीतील खास गोष्ट म्हणजे वेगासोबतच तो त्याच्या लाइन आणि लेन्थवरही काम करत आहे. याचसोबत त्याची अचूकता त्याला धोकादायक गोलंदाज बनवते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह स्मिथ तर त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजी करायची असल्याचे तो म्हणाला.

स्टीव्ह स्मिथ आयपीएल २०२४ मधील कोणत्याही फ्रेंचायझी संघाचा भाग नाही, परंतु तो समालोचन पॅनेलचा भाग आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीने स्मिथ ही प्रभावित झाला. यावर स्मिथ म्हणाला, “ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मयंक यादवचा संघात समावेश केला पाहिजे. मी त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

आरसीबीकडून मयंकने घेतलेल्या तीन विकेटपैकी दोन खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे होते. मयंकने रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन यांना बाद केले. दुखापतीमुळे मयंक गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता, पण या मोसमात संधी मिळताच त्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी लक्षणीय कामगिरी करून दाखवली आहे. त्याने खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीर ठरण्यासोबतच मयंक पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १५३ धावांपर्यंतच मर्यादित राहिला. आरसीबीचा संघ आयपीएल २०२४ मध्ये ऑलआऊट होणारा पहिला संघ बनला आहे आणि याचे बरेचसे श्रेय देखील मयंक यादवला जाते. ज्याने ४ षटकात केवळ १४ धावा देऊन ३ विकेट घेतले.