IPL Final 2025 RCB vs PBKS Revenue: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स आणि पंजाब किंग्स यांच्या आयपीएल २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. बंगळुरूने गट फेरीत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवत क्वालिफायर १ मध्ये पंजाबला पराभूत करत थेट अंतिम सामन्यात स्थान पटकावले होते. दुसरीकडे, पंजाबने क्वालिफायर १ मधील पराभवानंतर क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

अंतिम सामन्यात अंदाजे १८५ कोटी रुपयांची उलाढल

दरम्यान आज होत असलेला आयपीएलचा अंतिम सामना वर्षातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रिकेट सामन्यांपैकी एक ठरणार असला तरी, हा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात मौल्यवान सामना होण्याच्या मार्गावर आहे. कारण आजच्या सामन्यातून अंदाजे १८५ कोटी रुपयांची उलाढल होण्याची शक्यता आहे.

विजेत्याला बक्षिस म्हणून मिळणार २० कोटी रुपये

आयपीएल २०२५ च्या विजेत्याला २० कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत, तर उपविजेत्याला १३ कोटी बक्षीस रक्कम मिळेल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची आसन क्षमता ११४,६०० आहे, तर स्टेडियमची एकूण क्षमता १३२,००० आहे. अंतिम सामन्याची सरासरी तिकिट किंमत सुमारे २००० रुपये आहे, यातील सर्वात कमी तिकिट १५०० रुपये आहे. तर, सर्वात महागडे तिकिट ३०,००० रुपयांना आहे. याचबरोबर इतर अनेक पुरस्कार जाहीर केले जातील, जे अंदाजे ८० लाख रुपयांचे असणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाहिरातींमधून अंदाजे ४,५०० कोटी रुपये कमाई

संपूर्ण आयपीएल २०२५ हंगामात टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातींमधून अंदाजे ४,५०० कोटी रुपये कमाई होण्याचा अंदाज आहे. अंतिम सामन्याचे अचूक आकडे सार्वजनिकरित्या जाहीर केले नसले तरी, मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या संख्येमुळे या सामन्याला प्रीमियम जाहिरात दर मिळतात. असा अंदाज आहे की, केवळ अंतिम सामन्यात जाहिरातींच्या कमाईत १००-१२५ कोटी रुपयांची भर पडू शकते. याबाबत टाईम्स नाऊने वृत्त दिले आहे.