IPL 2025 LSG vs RCB Match Digvesh Rathi vs Jitesh Sharma : इंडियन प्रीमियर लीगमधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व लखनौ सुपरजायंट्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरूने लखनौवर दणदणीत विजय मिळवत क्वालिफायर १ मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. आरसीबीने कर्णधार जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला. तसेच आरसीबीने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठं लक्ष्य यशस्वीपणे पार करत विजय मिळवला आणि १४ सामन्यांनंतर गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे.
दरम्यान, या चित्तथरारक सामन्यात अनेक गंमतीजमती घडल्या. सामन्यातील अनेक घटनांची चर्चा होत आहे. यापैकी दोन घटना लखनौचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीच्या बाबतीत घडल्या आहेत. दिग्वेश या सामन्यात दोन वेळा तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळालं.
दिग्वेशकडून मंकडिंग रनआऊटचं अपील, पण कर्णधार ऋषभ पंतचा दिलदारपणा
दिग्वेश गोलंदाजी करत असताना त्याने बंगळुरूचा स्टँड इन कर्णधार जितेश शर्माचं मांकडिंग रनआऊट अपील केलं होतं. जितेश बाद झाला असता, मात्र, लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने दिलदारपणा दाखवत ते अपील मागे घेतलं. त्यानंतर दिग्वेशने पुन्हा एकदा जितेशला बाद केलं. मात्र, तिसऱ्या पंचांनी त्याला दणका दिला.
आरसीबीच्या डावातील १७ वं षटक दिग्वेश घेऊन आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर जितेशने स्वीप लगावला मात्र आयुष बदोनीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर दिग्वेशने त्याचं लोकप्रिय नोटबूक सेलिब्रेशन केलं. मात्र, मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे नो बॉल तपासण्याची विनंती केली. तो नो बॉल असल्याचं रिप्लेमध्ये दिसल्याने तिसऱ्या पंचांनी नो बॉल जाहीर केला. परिणामी जितेश नाबाद राहिला. तसेच मैदानावरील पुढचा चेंडू फ्री हिट असल्याचं जाहीर केलं. जितेशने त्यावर शानदार षटकाल लगावत दिग्वेशच्या सेलिब्रेशनला फलंदाजीतून उत्तर दिलं. तसेच २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या दिड षटकात त्याने सामना खिशात घातला.
आरसीबीचा लखनौवर दणदणीत विजय
लखनौने दिलेल्या २२७ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची चांगली सुरूवात झाली. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी ५ षटकांत ६० धावा करत दणक्यात सुरूवात केली. सॉल्ट ३० धावा करत बाद झाला. तर विराट कोहलीने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली. विराट ३० चेंडूत १० चौकारांसह ५४ धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवाल (२३ चेंडूत ४१) आणि जितेश शर्मा (३३ चेंडूत ८५) यांनी संघाला विजयापर्यंत नेले.