IPL 2025 Playoffs Schedule Announce: आयपीएल २०२५ च्या स्थगितीनंतर स्पर्धा एका आठवड्यानंतर पुन्हा सुरू झाली. यानंतर स्पर्धेचं वेळापत्रक पुन्हा बदलण्यात आलं. या सुधारित वेळापत्रकात आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांचं ठिकाण निश्चित नव्हतं. पण आता बीसीसीआयकडून अंतिम सामना आणि प्लेऑफचे सामने कुठे खेळवले जाणार याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
बीसीसीआयने आज म्हणजेच २० मे रोजी प्लेऑफ सामन्यांच्या ठिकाणाची घोषणा केली आहे. सुरूवातीच्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना सुरूवातीला कोलकातामध्ये होणार होता. तर प्लेऑफचे दोन सामने हैदराबादमध्ये होणार आहे. पण आता मात्र ही दोन्ही ठिकाणं बदलण्यात आली आहेत. आयपीएलचा अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये होणार आहे.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. तर स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामनादेखील याच मैदानावर होणार आहे. याशिवाय, क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामना चंदीगढच्या मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जातील.
नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. यापूर्वीही आयपीएलचे महत्त्वाचे सामने याच मैदानावर आयोजित केले गेले आहेत. २०२२ मध्ये, गुजरात टायटन्सने याच मैदानावर राजस्थान रॉयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर २०२३ मध्ये पावसामुळे अंतिम सामना दोन दिवस याच मैदानावर सुरू होता.
BCCI ने का बदललं IPL 2025च्या अंतिम सामन्याचं ठिकाण? कारण केलं स्पष्ट
आयपीएल २०२५चं वेळापत्रक जेव्हा जाहीर केलं होतं तेव्हा स्पर्धेचा अंतिम सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता. पण सध्या भारतात विविध ठिकाणी पावसाचं सावट असल्याने आणि इतर सर्व बाबी पाहता प्लेऑफचं ठिकाण बदलण्यात आलं, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
एकूण ४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर शेवटच्या स्थानासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये स्पर्धा आहे. प्लेऑफ सामने २९ मे पासून खेळवले जातील. तर अंतिम सामना ३ जूनला असेल.