मायभूमीत चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा काय किमया करू शकतो, याचा प्रत्यय महेंद्रसिंग धोनीने दिला. क्वॉलिफायर एकच्या लढतीत मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेल्या चेन्नईने धोनीच्या जन्मगावी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर तीन विकेट्सने विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरी गाठली. चेन्नईने प्रथम गोलंदाजी करताना बंगळुरूला १३९ धावांतच रोखले. माइक हसी आणि महेंद्रसिंग धोनीच्या संयमी खेळीच्या बळावर चेन्नईने हे लक्ष्य गाठले.
छोटय़ा पण आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने सुरुवात डळमळीत झाली. ड्वेन स्मिथ  (१७) धावा करून तंबूत परतला. माइक हसी आणि फॅफ डू प्लेसिस जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलने डू प्लेसिसला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. दुसऱ्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा सुरेश रैनाचा प्रयत्न डेव्हिड वाइसच्या हातात जाऊन विसावला. एकाच षटकात दोन विकेट्स गमावल्याने चेन्नईची ३ बाद ६१ अशी अवस्था झाली. यानंतर अनुभवी हसीला कर्णधार धोनीची साथ मिळाली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. डेव्हिड वाइसने हसीला बाद करत बंगळुरूला सामन्यात परतण्याची संधी दिली. हसीने ४६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा केल्या. हसी बाद झाल्यावर धोनीने सामन्याची सूत्रे हाती घेतली. १९व्या षटकात पवन नेगी आणि ड्वेन ब्राव्हो बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली. शेवटच्या षटकांत पाच धावांची आवश्यकता असताना धोनीने चार धावा वसूल केल्या. विजय एक धाव दूर असताना धोनी बाद झाला. त्याने २९ चेंडूंत २६ धावांची खेळी केली. अश्विनने एक धाव काढत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, चेन्नईचा धोनीने नाणेफेक जिंकून घेतलेला प्रथम गोलंदाजीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धोकादायक ख्रिस गेल आणि विराट कोहलीची जोडी दमदार सलामी देण्यात अपयशी ठरले. अनुभवी आशिष नेहराने विराटला (१२) मोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध निर्णायक अर्धशतकी खेळी करणारा ए बी डी’व्हीलियर्स केवळ एक धाव करून तंबूत परतला. नेहरानेच त्याला पायचीत केले. राजस्थानविरुद्ध चमकदार खेळी करणाऱ्या मनदीप सिंगला (४) अश्विनने फसवले. त्याने केवळ ४ धावा केल्या. खेळपट्टीवर नांगर टाकलेला गेल (४१) धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच सुरेश रैनाने त्याला बाद केले. दिनेश कार्तिक आणि सर्फराझ खान यांनी २७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. नेहराने पुन्हा एकदा कमाल दाखवत कार्तिकला (२८) तंबूचा रस्ता दाखवला. सर्फराझ खानने २१ चेंडूंत ३१ धावा केल्याने बंगळुरूला सव्वाशेचा टप्पा ओलांडता आला. डेव्हिड वाइजने ७ चेंडूंत १२ धावा करत त्याला चांगली साथ दिली.
 
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १३९ (ख्रिस गेल ४१, सर्फराझ खान ३१, आशिष नेहरा ३/२८) पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : १९.४ षटकांत ७ बाद १४० (माइक हसी ५६, महेंद्रसिंग धोनी २६, युझवेंद्र चहल २/२८)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 8 csk vs rcb ms dhoni mr cricket set up final date
First published on: 23-05-2015 at 05:55 IST