आयपीएलच्या मॅचेस बघताना आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं की कोणते खेळाडू चमकतायत आणि त्यातले खरे कसदार कोण, जे भारतीय क्रिकेटला चांगले दिवस दाखवतील. भारत फलंदाजांचा बालेकिल्ला असल्यानं तुडुंब प्रतिभावान फलंदाज असल्याशिवाय आपण संमोहित होत नाही. आपली वर्षानुवर्षं विरोधी संघाला दोनदा बाद करायची ताकद नसल्यानं आपण कायम गोलंदाजांच्या शोधात असतो. म्हणूनच कोणी १४० च्यावर गोलंदाजी करणारा सापडला तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयात जसे पेशंट धरून आणतात तसे आपण त्याला धरून डायरेक्ट नेटमध्ये आणतो. जुने खेळाडू, प्रशिक्षक एकमेकाला फोन करून एसएमएस करून बातमी देतात आणि दुस-या दिवशी नेटपाशी गर्दी करून डोळे भरून त्या गोलंदाजाचा रनअप, शरीरयष्टी, स्विंग, बाऊन्सर, यॉर्कर सगळं बघतात. त्याच्यावर टीप्सचा वर्षाव होतो. आपल्याकडे तेवढंच आकर्षण स्पिनर्सचं आहे. वेगवान गोलंदाज व्हायला जिगर लागते, तर स्पिनर्सला अव्वल दर्जाचं कौशल्य आणि संयम. भारतानं जेवढे कसोटी सामने मायदेशात आणि बाहेर जिंकले त्यात स्पिनर्सचा बोलबाला होता.
गेल्या तीस ते चाळीस वर्षांचा क्रिकेटचा इतिहास पाहिला तर कर्णधारांना लेग स्पिनर्सनी भुरळ पाडलेली दिसून येईल. लेग स्पिन हा क्रिकेटमधील कौशल्याचा सर्वोच्च आविष्कार असावा. कारण हाताच्या अनैसर्गिक (उलटय़ा) परिभ्रमणातून चेंडू टाकणे हे अतिजिकिरीचं काम. त्यात ठराविक टप्प्यावर चेंडू पडला पाहिजे, फलंदाज चकेल एवढाच वळला पाहिजे आणि मग विविधतेतून फलंदाजाला चकवणं. लेग स्पिनरचा कार्यआवाका मोठा असतो. श्रेष्ठ लेग स्पिनरच्यासमोर अभिजात फलंदाजानं सर्व कौशल्य वापरून लढलेली अस्तित्वाची लढाई हा प्रेक्षकांकरीता सर्वात रोमहर्षक अनुभव असतो. लेग स्पिनर ओव्हरला चार-पाच रन देईल, पण दिवसअखेर चांगल्या लेग स्पिनरच्या नावापुढे विकेट्स दिसणारच! कारण खूप संयमानं खडूस फलंदाजी करायला सगळे मुंबईच्या गुरुकुलातून निघालेले नसतात.
वाडेकरांना चंद्रा मिळाला आणि लाभला. इम्रान तर गोलंदाजांना घेऊन जग जिंकायला निघाला होता. त्याच्या दृष्टीनं श्रेष्ठ लेग स्पिनर संघात असणं म्हणजे सीरिज सुरू होण्याआधीच विजयोत्सवाची वाट बघण्यासारखं होतं. अब्दुल कादीर आणि मुश्ताक अहमदला त्यानं अणुशास्त्रज्ञाला जपावं तसं जपलं. कादीर आणि मुश्ताकनंसुद्धा त्याचा विश्वास सार्थ ठरवत अनेक विजय मिळवून दिले. ऐन भरातल्या वेस्ट इंडिजला इम्रानच्या संघानं वेस्ट इंडिजमध्ये जाऊन जवळजवळ हरवलं होतं. पंचाचा पक्षपात आडवा आला नसता, तर इम्राननं अशक्य ते शक्य करून दाखवलं असतं. (त्या मालिकेनंतरच इम्राननं त्रयस्थ पंचाचा मुद्दा ऐरणीवर आणला.) कादीरच्या लेग स्पिननं आणि मुश्ताकच्या गुगलीनं धमाल उडवून दिली होती. नतंरच्या काळात शेन वॉर्न आख्यायिका बनला. क्रिकेट इतिहासातला सर्वात परिपूर्ण लेग स्पिनर. त्यानं ऑस्ट्रेलियाला अगणित विजय मिळवून दिले. तेच सत्य कुंबळेच्या बाबतीत. फटाक्याच्या माळेसारखे सलग विजय कुंबळेनं मिळवून दिले. कुंबळेच्या फ्लिपरची आणि बाऊन्सची धास्ती तमाम क्रिकेटविश्वानं घेतली.
मग सध्या भारतीय संघाच्या पत्रिकेत लेग स्पिनरचा योग आहे का नाही? चावला, मिश्रा, राहुल शर्मा आणि करण शर्मा असे चार लेग स्पिनर्स दिसतायत. त्यातले चावला, करण आणि राहुल शर्मा हे कुंबळेच्या जातकुळीतले, तर मिश्रा जास्त नेत्रसुखद. पहिल्या तिघांचे गुगली हे मुख्य अस्त्र, तर मिश्राचा चेंडू चांगला लेग स्पिन होतो. त्याच्या गुगलीला छान शॉक व्हॅल्यू आहे. मिश्राला चॅम्पियन्स ट्रॉफीला नेतायत. पण त्याचा फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. मिश्राच्या वाढत्या देहावरून हा पेढय़ाच्या दुकानाच्या किंवा कचोरीच्या दुकानाच्या गल्ल्यावरून उचलून आणल्यासारखा दिसतो. मॅच फिटनेस या आधुनिक संकल्पनेला डावलणारे खेळाडू फार दिवस स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं अवघड असतं. चावला अजमावून झाला आहे. फक्त गुगलीवर किती योगक्षेम चालवणार? राहुल शर्माला माजी खेळाडूंनी कौल दिला होता, पण कुंबळेसारखे व्रतस्थ असाल तर क्रिकेटमध्ये लांबचा पल्ला गाठता येतो हे त्याला लवकर कळायला हवं. करण शर्माकडे लक्ष ठेवून राहू. पण सध्यातरी लेग स्पिनरचे सुख आपल्या राशीला नाहीच!
sachoten@hotmail.com
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2013 रोजी प्रकाशित
BLOG: भारताला कोणता लेग स्पिनर लाभेल?
आयपीएलच्या मॅचेस बघताना आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं की कोणते खेळाडू चमकतायत आणि त्यातले खरे कसदार कोण, जे भारतीय क्रिकेटला चांगले दिवस दाखवतील.
First published on: 10-05-2013 at 09:15 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl blog on leg spinners in indian team by ravi patki