स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला नवीन हंगामात धक्का बसला आहे. कारण नवीन हंगामात चेन्नईमध्ये आयपीएलचे सामने होणार नाहीयेत. कावेरी पाणीवाटपावरुन सध्या तामिळनाडूत राजकारण चांगलचं तापलेलं आहे. अनेक राजकीय पक्षांनी आयपीएलच्या सामन्यांना आपला विरोध दर्शवला आहे. काल चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याआधीही अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाबाहेर निदर्शनं केली. याचसोबत सामना सुरु असताना तामिळी संघटनेच्या कार्यकर्त्याने चेन्नईच्या संघातील खेळाडूच्या दिशेने बूट फेकून मारला. त्यामुळे ही सर्व कारणं लक्षात घेता, चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचे होणारे सामने बाहेरच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.

पहिल्या सामन्यात तामिळ संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मैदानात शिरत, आयपीएल सामन्यांविरोधात आपली निदर्शन केली.

दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईसाठी यंदाच्या हंगामात चेपॉकच्या मैदानात होणारे सामने अतिशय महत्वाचे मानले जात होते. त्याप्रमाणे कोलकात्याविरोधातला आपला पहिला सामना जिंकत चेन्नईने नवीन हंगामात विजयासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र आता चेन्नईतून यंदाच्या हंगामासाठी आयपीएल हद्दपार झाल्यामुळे संघाच्या पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.