स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन परतलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने, अकराव्या हंगामाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याशी चेन्नईचा अंतिम फेरीत सामना होणार आहे. २७ मे रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात हा सामना रंगणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या कल्पक नेतृत्वगुणांमुळे चेन्नईने अंतिम फेरी गाठली आहे, त्यामुळे आपल्या कर्णधारासाठी यंदाचं आयपीएल आम्हाला जिंकायचं असल्याचं सुरेश रैनाने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हैदराबादवर मात करुन आमचा संघ अंतिम फेरीत पोहचला तेव्हा धोनी भावुक झाला होता. त्याच्या डोक्यात सतत संघाबद्दलचे विचार सुरु असतात. २००८ सालापासून धोनी चेन्नईसाठी सर्वोत्तम कामगिरी करतो आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आम्हाला त्याच्यासाठी आयपीएल जिंकायचं आहे.” चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रैना बोलत होता.

अवश्य वाचा – Video : चेन्नईच्या ‘या’ क्रिकेटपटूचा मुलगा करतोय वडिलांनीच नक्कल

ज्या-ज्या वेळी धोनीवर टीका झालेली आहे, त्यावेळी आपल्या कामगिरीने धोनीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळा एखाद्या खेळाडूची कामगिरी पाहताना, त्याची खेळाप्रती असणारी निष्ठा पाहणंही गरजेचं असल्याचं रैना म्हणाला. शेन वॉटसन, अंबाती रायडू यांसारख्या खेळाडुंमुळे आमचा संघ समतोल आणि मजबुत झालेला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाचं विजेतेपद पटकावण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल असंही रैना म्हणाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 want to win trophy for ms dhoni says suresh raina
First published on: 25-05-2018 at 15:00 IST