रविवारचा दिवस आयपीएलच्या चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहिल. सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागल्यामुळे चाहत्यांना थरारक सामन्यांचा अनुभव घ्यायला मिळाला. दुबईच्या मैदानावर निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपरओव्हर खेळवण्यात आली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकताना एका षटकात फक्त ५ धावा देत भेदक मारा केला. या षटकात बुमराहने २ बळीही मिळवले. त्यामुळे विजयासाठी अवघ्या ६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईला विजयासाठी चांगली संधी होती. परंतू अनुभवी मोहम्मद शमीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी २ धावा हव्या असताना क्विंटन डी-कॉक धावबाद झाला आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडी मैदानात उतरली. पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईला दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये ११ धावा काढून दिल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या १२ धावांचं आव्हान पंजाबकडून ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल मैदानात उतरले. मुंबईने ट्रेंट बोल्टला दुसरी सुपरओव्हर टाकण्याची संधी दिली. बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत गेलने धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयांक अग्रवालने गेलचा कित्ता गिरवत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एकाच दिवशी दोन सामन्यांना निकाल सुपरओव्हरवर लागण्याचा आणि पहिली सुपरओव्हर अनिर्णित राहण्याची आयपीएलच्या इतिहासातली पहिली वेळ ठरली आहे.

निर्धारित षटकांत जसप्रीत बुमराह, राहुल चहर आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. १७७ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघाने अखेरच्या चेंडूवर हाराकिरी केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पहिल्या डावात पंजाबकडून लोकेश राहुलने ७७ धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट यांनी सुरेख मारा करत पंजाबला पहिल्या डावात चांगली झुंज दिली. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ३ तर राहुल चहरने २ बळी घेतले.

१७७ धावांचा पाठलाग करताना पंजाबने आश्वासक सुरुवात केली. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण आणण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मयांक त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. यानंतर मैदानावर आलेल्या ख्रिस गेलने लोकेश राहुलला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांना मैदानावर जम बसतोय असं वाटत असताना गेल राहुल चहरच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर ट्रेंट बोल्टकडे झेल देऊन माघारी परतला, त्याने २४ धावा केल्या. यानंतर फटकेबाजी करणाऱ्या निकोलस पूरनला जसप्रीत बुमराहने उसळता चेंडू टाकत आपल्या जाळ्यात अडकवलं. आपले सहकारी एकामागोमाग एक माघारी परतत असताना लोकेश राहुल एक बाजू लावून धरत होता. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत राहुलने आपलं अर्धशतकही झळकावलं. पूरन माघारी परतल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतू लोकेश राहुलने हार न मानता दिपक हुडाच्या साथीने फटकेबाजी सुरु ठेवत पंजाबचं सामन्यातलं आव्हान कायम राखलं. परंतू जसप्रीत बुमराहने १८ व्या षटकात लोकेश राहुलला सुरेख यॉर्कर चेंडूवर त्रिफळाचीत करुन माघारी धाडलं. राहुलने ५१ चेंडूत ७७ धावा केल्या. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीत ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

त्याआधी, क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक आणि अखेरच्या फळीत फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने पंजाबविरुद्धच्या सामन्यात १७६ धावांचा पल्ला गाठला आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी आज निराशा केली. पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मुंबईचे फलंदाज हतबल ठरले. परंतू डी-कॉक आणि अखेरच्या फळीत पोलार्ड आणि कुल्टर नाईल जोडीने फटकेबाजी करत मुंबईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉकने संघाला सावध सुरुवात करुन दिली. परंतू रोहित शर्माच्या अपयशाची मालिका पंजाबविरुद्ध सामन्यातही कायम राहिली. अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर रोहित ९ धावांवर त्रिफळाचीत झाला. यानंतर भरवशाचा सूर्यकुमार यादवही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरगन आश्विनकडे झेल देऊन माघारी परतला, सूर्यकुमार एकही धाव करु शकला नाही. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या इशान किशननेही या सामन्यात निराशा केली. अर्शदीपच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर आश्विनकडे झेल देत आश्विन माघारी परतला. एकीकडे मुंबईचे फलंदाज माघारी परतत असताना डी-कॉकने एक बाजू लावून धरली होती.

कृणाल पांड्यासोबत डी-कॉकने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत कृणाल आणि डी-कॉकने काही सुरेख फटके लगावले. ही जोडी मैदानावर स्थिरावत आहे असं वाटत असतानाच पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने रवी बिश्नोईला गोलंदाजीची संधी दिली. बिश्नोईनेही आपल्या कर्णधाराला निराश न करता कृणालला माघारी धाडलं. त्याने ३४ धावा केल्या. दरम्यानच्या काळात डी-कॉकने आपलं अर्धशतक साजरं केलं. हार्दिक पांड्याही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये धावा जमवण्यात मुंबईचे फलंदाज अपयशी ठरत असल्यामुळे फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात डी-कॉक ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. १७ व्या षटकांत मुंबईची अवस्था ६ बाद ११९ अशी झाली होती. यानंतर मैदानात आलेल्या कायरन पोलार्डने आपली जबाबदारी ओळखत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. कुल्टर-नाईलच्या मदतीने पोलार्डने मुंबईला १७६ धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी २-२ तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

Highlights

    00:25 (IST)19 Oct 2020
    ख्रिस गेल - मयांक अग्रवाल जोडीकडून विजयासाठीचं आव्हान पूर्ण

    दोन सुपरओव्हर्सचा थरार अखेरीस संपला, रंगतदार सामन्यात पंजाबची मुंबईवर मात

    00:04 (IST)19 Oct 2020
    दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये मुंबईची ११ धावांपर्यंत मजल

    पंजाबला विजयासाठी १२ धावांचं आव्हान

    23:48 (IST)18 Oct 2020
    पहिली सुपरओव्हरही अनिर्णीत अवस्थेत

    एका चेंडूत विजयासाठी २ धावा हव्या असताना डी-कॉक धावबाद

    दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये लागणार निकाल

    23:35 (IST)18 Oct 2020
    अखेरच्या चेंडूवर लोकेश राहुल माघारी

    रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात राहुल बाद, सुपरओव्हरमध्ये पंजाबची ५ धावांपर्यंत मजल

    जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, मुंबईला विजयासाठी ६ धावांचं आव्हान

    23:31 (IST)18 Oct 2020
    सुपर ओव्हरमध्ये मुंबईला पहिलं यश

    बुमराहच्या गोलंदाजीवर निकोलस पूरन माघारी

    23:27 (IST)18 Oct 2020
    सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल लागणार सुपरओव्हरमध्ये

    पंजाब विरुद्ध मुंबई सामना बरोबरीत, लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर दिपक हुडा-जॉर्डनची चांगली झुंज

    परंतू एका चेंडूत २ धावा हव्या असताना पंजाबचा फलंदाज धावबाद होऊन माघारी, सामना सुपरओव्हरमध्ये

    22:40 (IST)18 Oct 2020
    चहरच्या गोलंदाजीत मुंबईला आणखी एक यश

    ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर माघारी धाडण्यात मुंबई यशस्वी, स्लिपमध्ये रोहित शर्माने घेतला झेल

    मुंबई इंडियन्स सामन्यात पुन्हा एकदा वरचढ

    22:39 (IST)18 Oct 2020
    कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक

    एक बाजू लावून धरत राहुलचं अर्धशतक, चहरच्या गोलंदाजीवर षटकार खेचत राहुलची जिगरबाज खेळी

    22:38 (IST)18 Oct 2020
    निकोलस पूरनला माघारी धाडण्यात मुंबईला यश

    जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाऊंसर चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरन माघारी

    १२ चेंडूत २४ धावा काढत पूरन माघारी, ट्रेंट बोल्टने घेतला झेल

    22:19 (IST)18 Oct 2020
    पंजाबला मोठा धक्का, ख्रिस गेल बाद

    २१ चेंडूत २४ धावा काढत गेल माघारी, राहुल चहरच्या गोलंदाजीवर ट्रेंट बोल्टने घेतला झेल

    22:10 (IST)18 Oct 2020
    राहुल-गेलने सावरला पंजाबचा डाव

    मयंक अग्रवाल लवकर बाद झाल्यावर केएल राहुल आणि ख्रिस गेल या दोघांनी पंजाबचा डाव सावरला. 

    21:51 (IST)18 Oct 2020
    क्विंटन डी-कॉकच्या या विक्रमाबद्दल तुम्हाला माहिती आहे का??

    अर्धशतकी खेळी करत सावरला संघाचा डाव, जाणून घ्या...

    21:48 (IST)18 Oct 2020
    पंजाबला पहिला धक्का, मयांक अग्रवाल माघारी

    जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मयांक त्रिफळाचीत, पंजाबची सलामीची जोडी फुटली

    21:20 (IST)18 Oct 2020
    पोलार्डच्या फटकेबाजीने बदललं सामन्याचं चित्र
    21:15 (IST)18 Oct 2020
    कायरन पोलार्ड आणि नेथन कुल्टर नाईल जोडीची अखेरच्या षटकांत फटकेबाजी

    पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी भागीदारी

    २० षटकांत मुंबईची १७६ धावांपर्यंत मजल, पंजाबला विजयासाठी १७७ धावांचं आव्हान

    20:55 (IST)18 Oct 2020
    अर्धशतकवीर क्विंटन डी-कॉक बाद

    ४३ चेंडूत ५३ धावांची खेळी करत डी-कॉक बाद, अखेरच्या षटकांमध्ये धावा जमवण्याच्या दडपणातून मुंबईच्या फलंदाजांची हाराकिरी

    20:49 (IST)18 Oct 2020
    मुंबईला पाचवा धक्का, हार्दिक पांड्या माघारी

    मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न

    ८ धावा काढून हार्दिक पांड्या माघारी

    20:42 (IST)18 Oct 2020
    क्विंटन डी-कॉक अर्धशतक, मुंबईची झुंज सुरुच

    पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत डी-कॉकने झळकावलं अर्धशतक

    20:41 (IST)18 Oct 2020
    मुंबईची जमलेली जोडी फुटली, कृणाल पांड्या माघारी

    रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कृणाल माघारी

    कृणाल पांड्याची ३० चेंडूत ३४ धावांची खेळी, चौथ्या विकेटसाठी डी-कॉकसोबत ५८ धावांची भागीदारी

    20:16 (IST)18 Oct 2020
    ९ षटकांनंतर मुंबई ३ बाद ६०

    क्विंटन डी-कॉकची झुंज सुरुच

    19:57 (IST)18 Oct 2020
    मुंबईच्या फलंदाजांची हाराकिरी सुरुच, इशान किशन स्वस्तात बाद

    अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाकडे झेल देत किशन माघारी

    19:53 (IST)18 Oct 2020
    मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव माघारी

    मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरगन आश्विनकडे झेल देऊन यादव बाद

    एकही धाव न काढता सूर्यकुमार माघारी परतला

    19:45 (IST)18 Oct 2020
    मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

    मुंबईच्या कर्णधाराची अपयशाची मालिका सुरुच

    अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवक ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेऊन थेट स्टम्पवर

    19:12 (IST)18 Oct 2020
    हार्दिक पांड्याची हेअर स्टाईल ठरतेय चर्चेचा विषय...

    तुम्हाला आवडली का ही स्टाईल...

    19:10 (IST)18 Oct 2020
    पंजाबच्या संघात कोणतेही बदल नाहीत
    19:09 (IST)18 Oct 2020
    एक नजर मुंबई इंडियन्सच्या संघावर...
    19:08 (IST)18 Oct 2020
    मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

    मुंबईचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, संघात कोणतेही बदल नाहीत

    Web Title: Ipl 2020 mi vs kxip live updates psd
    First published on: 18-10-2020 at 19:02 IST