मुंबईविरूद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने ८ गडी राखून विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज ६० धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने नाबाद दीडशतकी भागीदारी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला. राजस्थानच्या विजयामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले, पण चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथम फलंदाजी करताना फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाची राजस्थानविरुद्ध सामन्यात खराब सुरुवात झाली. धडाकेबाज खेळी करणारा क्विंटन डी-कॉक पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने ४० तर इशान किशनने ३७ धावा केल्या. यानंतर शेवटच्या ४ षटकांत मुंबईने तुफान फटकेबाजी करत ७२ धावा मारल्या. हार्दिक पांड्याने नाबाद राहत २१ चेंडूत ६० धावा केल्या. या खेळीत त्याने तब्बल ७ षटकार ठोकले.

१९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. जेम्स पॅटिन्सनने रॉबिन उथप्पा (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (११) या दोघांना स्वस्तात माघारी धाडलं. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने यांनी मुंबईच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांचेही चेंडू स्टोक्स-सॅमसन जोडीने सीमारेषेपार पाठवले. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सने ६० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद १०७ धावा केल्या. तर संजून सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५४ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

Live Blog

Highlights

    23:17 (IST)25 Oct 2020
    बेन स्टोक्सचं धडाकेबाज शतक; राजस्थानचा मुंबईवर विजय

    मुंबईविरूद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने ८ गडी राखून विजय मिळवला. स्टोक्सने ६० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद १०७ धावा केल्या. तर संजून सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५४ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

    22:46 (IST)25 Oct 2020
    संजू सॅमसनचं दमदार अर्धशतक

    मोक्याच्या क्षणी संजू सॅमसनचं दमदार अर्धशतक

    २७ चेंडूत केलं अर्धशतक

    22:42 (IST)25 Oct 2020
    बेन स्टोक्स-संजू सॅमसन जोडीची शतकी भागीदारी

    बेन स्टोक्स-संजू सॅमसन जोडीची शतकी भागीदारी

    सामन्यात राजस्थानचं दमदार पुनरागमन

    22:27 (IST)25 Oct 2020
    बेन स्टोक्सला सूर गवसला; ठोकलं दमदार अर्धशतक

    सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरणाऱ्या बेन स्टोक्सला सूर गवसला

    ३० चेंडूत ठोकलं दमदार अर्धशतक

    21:53 (IST)25 Oct 2020
    कर्णधार स्मिथ त्रिफळाचीत; राजस्थानला दुसरा धक्का

    फटकेबाजी करणारा कर्णधार स्टीव्ह स्मिथ त्रिफळाचीत

    जेम्स पॅटिन्सनने ऑफकटर चेंडू टाकत घेतला बळी

    21:42 (IST)25 Oct 2020
    राजस्थानला पहिला धक्का, रॉबिन उथप्पा माघारी

    पुनरागमन केलेल्या जेम्स पॅटिन्सनने मिळवून दिलं मुंबईला पहिलं यश

    कायरन पोलार्डकडे झेल देऊन उथप्पा माघारी, राजस्थानची खराब सुरुवात

    21:16 (IST)25 Oct 2020
    हार्दिक पांड्याची अखेरच्या षटकांत फटकेबाजी, मुंबईची १९५ धावांपर्यंत मजल

    राजस्थानला विजयासाठी १९६ धावांचं आव्हान, हार्दिक पांड्याच्या २१ चेंडूच २ चौकार आणि ७ षटकारांनिशी नाबाद ६० धावा

    21:06 (IST)25 Oct 2020
    हार्दिक पांड्या - सौरभ तिवारी जोडीची फटकेबाजी

    अखेरच्या षटकांत पांड्या-तिवारीची फटकेबाजी, मुंबईने ओलांडला सन्मानजनक धावसंख्येचा टप्पा

    २५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने तिवारीची ३४ धावांची खेळी, जोफ्रा आर्चरने घेतला बळी

    20:38 (IST)25 Oct 2020
    मुंबई इंडियन्स संकटात, कर्णधार पोलार्ड तंबूत परतला

    श्रेयस गोपाळचा एकाच षटकात मुंबईला दुसरा धक्का, पोलार्ड ६ धावा काढून बाद

    राजस्थान रॉयल्सचं सामन्यात पुनरागमन

    20:35 (IST)25 Oct 2020
    सूर्यकुमार यादवही माघारी परतला, मुंबईची मैदानावर स्थिरावलेली जोडी माघारी

    श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर बेन स्टोक्सने घेतला झेल

    २६ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने सूर्यकुमारच्या ४० धावा

    20:28 (IST)25 Oct 2020
    मुंबईची जमलेली जोडी फोडण्यात राजस्थानला यश, इशान किशन बाद

    कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर इशान किशन जोफ्रा आर्चरकडे देऊन माघारी

    सीमारेषेवर आर्चरने घेतला भन्नाट झेल, ३६ चेंडूत ३७ धावा करत इशान किशन बाद

    20:08 (IST)25 Oct 2020
    पॉवरप्लेच्या षटकांमध्ये मुंबई इंडियन्सचं वर्चस्व
    20:01 (IST)25 Oct 2020
    सूर्यकुमार - इशान किशनने सावरला मुंबईचा डाव

    राजस्थानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना, मुंबई इंडियन्सने ओलांडला ५० धावांचा टप्पा

    19:36 (IST)25 Oct 2020
    पहिल्याच षटकात मुंबईला धक्का, क्विंटन डी-कॉक बाद

    जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर उंच षटकार खेचल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर डी-कॉक क्लिन बोल्ड

    आर्चरचा भेदक मारा सुरुच, ६ धावा काढून डी-कॉक बाद

    19:14 (IST)25 Oct 2020
    जाणून घ्या कसा आहे राजस्थान रॉयल्सचा संघ
    19:13 (IST)25 Oct 2020
    मुंबईच्या संघात एक बदल, पॅटिन्सनचं पुनरागमन
    19:12 (IST)25 Oct 2020
    मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

    राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यातही कायरन पोलार्डकडेच संघाचं नेतृत्व

    Web Title: Ipl 2020 mi vs rr live updates psd
    First published on: 25-10-2020 at 19:03 IST