IPL 2025 Catch of The Tournament by Kusal Mendis CSK vs SRH: आयपीएल २०२५ मधील कॅच ऑफ द टूर्नामेंट म्हटला जाईल असा कमालीचा झेल चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करताना चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेविस उत्कृष्ट फलंदाजी करत होता. पण त्याला माघारी धाडण्यासाठी तशाच कामगिरीची गरज होती आणि कामिंदू मेंडिसने सीमारेषेजवळ थक्क करणारा झेल टिपला. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी केली पण त्यांचे फलंदाज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. १७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेने निश्चितच एक छोटी पण वादळी खेळी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्याच्याशिवाय, एका फलंदाजाने आपली प्रतिभा दाखवली आणि तो होता डेवाल्ड ब्रेव्हिस, ज्याने सीएसकेसाठी या सामन्यात पदार्पण केले.

डेवाल्ड ब्रेव्हिसने फक्त २४ चेंडूत ४२ धावा केल्या होत्या आणि तो संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. पण २५ व्या चेंडूवर त्याने अद्भुत क्षेत्ररक्षणामुळे आपली विकेट गमावली. १३ व्या षटकात, ब्रेविसने हर्षल पटेलचा चेंडू पूर्ण ताकदीने खेळला आणि चेंडू बुलेटच्या वेगाने लाँग ऑफच्या दिशेने सीमा ओलांडताना दिसला. पण तिथेच तैनात असलेल्या मेंडिसने डावीकडे धाव घेतली, एक लांब डाईव्ह घेत दोन्ही हातांनी चेंडू हवेत पकडला.

ब्रेविसने फटका मारलेला चेंडू चज्या वेगाने आला तो लक्षात घेता, मेंडिसने झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. या एका झेलमुळे ब्रेविसला माघारी धाडलं आणि चेन्नईच्या धावांच्या गतीला ब्रेक लागला. अर्थातच हा या हंगामातील सर्वोत्तम झेल होता. मेंडिसने कमालीचा झेल टिपल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनेही सर्वांचं लक्ष वेधलं.

मेंडिसने केवळ त्याच्या क्षेत्ररक्षणातच चमकदार कामगिरी केली नाही तर त्याच्या गोलंदाजीने संघाला मोठे यशही मिळवून दिले. मेंडिसने आपल्या ऑफ-स्पिन गोलंदाजीने चेन्नईचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला त्रिफळाचीत केलं आणि चेन्नईच्या धावांना ब्रेक लावला.