Kavya Maran Celebration After Hyderabad Win : आयपीएल २०२४ मध्ये शुक्रवारी रात्री सनरायझर्स हैदराबाद संघाने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सनरायझर्स हैदरबादने ६ वर्षानंतर तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात २६ मे रोजी होणार आहे. या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना केवळ १७५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ केवळ १३९ धावा करू शकला. मात्र, १९ वे षटक संपताच सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आनंदाने उडी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काव्या मारनचा व्हिडीओ व्हायरल –
राजस्थान रॉयल्सला विजयासाठी शेटच्या ६ चेंडूत ४२ धावांची गरज होती, जे जवळपास अशक्य होते. अशा स्थितीत काव्या मारनने सामना संपण्याची वाट पाहिली नाही आणि विजयाच्या जल्लोषात मग्न झाली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संघ जिंकलेला पाहून काव्याने आनंदात जाऊन वडिलांना मिठी मारली आणि टाळ्या दिल्या.
सनरायझर्स हैदराबादची तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक –
आयपीएल इतिहासात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादने तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. या हंगामात संघाने अंतिम फेरीत आरसीबीचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. यानंतर, २०१८ मध्ये, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, सनरायझर्स संघ फायनलमध्ये पोहोचण्यातही यशस्वी ठरला होता, परंतु यावेळी चेन्नईने त्याचा पराभव केला. आता १७ व्या मोसमात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स संघाने पुन्हा फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. ज्यामुळे काव्या मारन खूप आनंदी आहे.
प्लेऑफ्समधील राजस्थानचा सहावा पराभव –
आयपीएलच्या प्लेऑफ्समधील ११ सामन्यांमधला राजस्थान संघाचा हा सहावा पराभव आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा राजस्थान हा सहावा संघ आहे. प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याचा अवांछित विक्रम आरसीबीच्या नावावर आहे, ज्याने १६ सामन्यांमध्ये १० सामने गमावले आहेत, तर दुसऱ्या स्थानावर सीएसके संघ आहे ज्याने २६ प्लेऑफ्समध्ये सामन्यांमध्ये नऊ सामने गमावले आहेत. दुसरीकडे, हैदराबादचा संघ तिसऱ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.
हेही वाचा – RR vs SRH : सामना हरताना पाहून राजस्थान रॉयल्सची चाहती भावूक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल
कमिन्सने कुंबळेच्या विक्रमाशी केली बरोबरी –
पॅट कमिन्सने या मोसमात १७ विकेट घेतल्या आहेत आणि कर्णधार म्हणून आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. कुंबळेने २०१० मध्ये आरसीबीचे कर्णधार असताना १७ विकेट्स घेतल्या होत्या आणि आता कमिन्सनेही कर्णधार म्हणून तेवढ्याच विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या कोणत्याही मोसमात कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्नच्या नावावर आहे, ज्याने २००८ च्या मोसमात १९ विकेट्स घेतल्या होत्या. जर कमिन्स अंतिम सामन्यात तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो या बाबतीत शेन वॉर्नला मागे टाकेल.